‘नवी मुंबईत वॉर्ड आहेत एकशे अकरा, काँग्रेस-राष्ट्रवादीचा करायचा आहे बकरा’ – आठवले

Ramdas Athawale.jpg

नवी मुंबई : ‘नवी मुंबईत वॉर्ड आहेत एकशे अकरा, काँग्रेस-राष्ट्रवादीचा करायचा आहे बकरा, आम्ही चालू देणार नाही शिवसेनेचा नखरा, भाजप-आरपीआय युतीच्या विजयासाठी गणेश नाईक आणि मी मारणार आहे नवी मुंबईच्या चकरा!’, अशी कविता ऐकवत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आघाडी सरकारला लक्ष्य केलं. आगामी नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नवी मुंबईत रिपाइंचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला संबोधित करताना आठवले यांनी ही कोपरखळी मारली.

आगामी नवी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपसोबत रिपब्लिकन पक्ष युती करून किमान 8 जागांवर आपले उमेदवार उभे करील. भाजपला सध्या 25 जागांची यादी दिली असून त्यातील 8 जागा रिपाइंला देण्यात याव्यात असा प्रस्ताव भाजपला दिला आहे. अनेकांनी झेंडा बदलला; पक्षाचे नाव बदलले मात्र आम्ही कधीही हाती घेतलला निळा झेंडा खाली ठेवणार नाही. आम्ही कधीही रिपब्लिकन नाव बदलणार नाही. आम्ही अभिमानाने जगाला सांगत आहोत आमची घोषणा आहे ‘मी रिपब्लिकन’! माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी रिपब्लिकन पक्षाचे नाव जिवंत ठेवणार असा विश्वास व्यक्त करत त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर निशाणा साधला.

मंत्रिपदापेक्षा कार्यकर्ता म्हणून मी स्वतःला मोठा मानतो. मंत्रिपद असो की नसो, मी रिपब्लिकन पक्षाला पुढे घेऊन जात आहे. जनता माझ्या सोबत आणि मी जनतेसोबत आहे. नवी मुंबई प्रमाणे औरंगाबाद, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली या महापालिका आणि पुढील वर्षी होणाऱ्या मुंबई महापालिकेसह अन्य 10 महापालिका आणि 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत भाजपच्या पाठीशी रिपब्लिकन पक्ष खंबीर उभा राहून युती करेल, असा विश्वास आम्ही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, येत्या 25 फेब्रुवारी रोजी देशभर रिपाइंकडून भूमीमुक्ती आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. ग्रामीण भागात गरीब भूमीहिनांना 5 एकर जमीन कसण्यासाठी द्यावी, ज्यामुळे शहरात येणारे लोंढे गावातच थांबतील, तसेच दारिद्रय रेषेखालील गरिबांची वाढती संख्या कमी होईल, असा दावाही त्यांनी केला.

नवी मुंबईतील झोपडीवासीयांचे प्रश्न सोडविण्यात रिपब्लिकन पक्षाने महत्वाची भूमिका निभावली आहे. भारतीय दलित पँथरपासून नवी मुंबईतील झोपड्यांना अधिकृत मान्यता देण्यासाठी, झोपडीवासियांना पक्की घरे मिळवून देण्यासाठी रिपाइंने वेळोवेळी आंदोलन केले आहे, असं सांगतानाच आगामी महापालिका निवडणुकीत नवी मुंबईतील रिपब्लिकन पक्षाची ताकद दाखवा, असे आवाहन ही त्यांनी केले. यावेळी रिपाइंचे ज्येष्ठ नेते माजी आमदार सुमंतराव गायकवाड, सुरेश बारशिंग, पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड, नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष सिद्राम ओव्हाळ, यशपाल ओव्हाळ, बाळासाहेब मिरजे, विजय गायकवाड, जयश्री सुरवसे, आदी मान्यवर उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER