कोणी कुत्रा म्हणाले, कोणी मांजर…पण मी काम करत राहतो-रामदास आठवलेंचे मनोगत

Ramdas Athawale

पुणे (प्रतिनिधी) : अनेकजण मला कुत्रा म्हणाले. कोणी मांजर म्हणाले. काहींनी गल्लीबोळातला कार्यकर्ता म्हणून मला हिणवले. पण त्याकडे लक्ष न देता मी दिल्लीत चांगले काम करण्याचा प्रयत्न करतो, या शब्दात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मनोगत व्यक्त केले.

राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर यांचा पुणे महापालिकेच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने गौरव करण्यात आला. आठवले यांच्या हस्ते पुुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. खासदार गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, रिपब्लिक पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, शहराध्यक्ष अशोक कांबळे, अल्पसंख्याक आघाडीचे आयुब शेख, कार्याध्यक्ष संजय सोनवणे, नगरसेविका सुनीता वाडेकर, नगरसेवक राजेश येनपुरे, प्रा. विलास आढाव आदी यावेळी उपस्थित होते.

आठवले म्हणाले, की मोदी हटावसाठी एकत्र आलेल्यांनाच बाजूला हटावे लागले. रिपब्लीकन पक्ष ज्यांच्या पाठीशी उभा राहतो, त्याची सत्ता येते हे समजून घेतले पाहिजे. एकही खासदार नसताना मला मंत्रीपद मिळाल्याचे अनेकांना आश्चर्य वाटते. पण मी लोकांच्या हिणवण्याकडे लक्ष न देता काम करत राहतो. मोदी पंतप्रधान झाल्यामुळे संविधान बदलले जाणार असल्याच्या निव्वळ वावड्या उठवल्या जात असल्याचेही आठवले म्हणाले. त्यांनी सांगितले, की नरेंद्र मोदी संविधानाला प्रमाण मानून काम करत आहेत. संविधानामुळेच चहा विकणारा एक माणूस पंतप्रधान होऊ शकला, याचा त्यांना अभिमान आहे. त्यामुळे संविधान बदलणार नाही. निळा झेंडा घेऊन मी संविधानाच्या रक्षणासाठीच मी दिल्लीत गेलो आहे.

‘लोकमान्य टिळक यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रचनेत मोठे योगदान दिले. पुण्यात होणारा सन्मान मोठा असतो. येथे सर्व जातीधर्माचे लोक एकत्रितपणे नांदतात, ही आनंदाची बाब आहे,’ असेही प्रतिपादन आठवले यांनी केले. अविनाश महातेकर म्हणाले, ‘ज्या शहरात घडलो, त्या शहराच्या वतीने झालेल्या सन्मानाने मोठा आनंद झाला. आंबेडकरी चळवळीच्या निमित्ताने अनेक लोकांच्या संगतीने जीवन समृद्ध होत गेले. विचारांशी प्रामाणिक राहत योग्य वेळी सन्मान मिळेल ,याची खात्री होती. त्यामुळे काही मागायचे नाही आणि सन्मानाने मिळाल्याशिवाय स्वीकारायचे नाही हा संस्कार माझ्यावर झाला.’ संविधान कोणीही बदलू शकत नाही. काहीजण विनाकारण दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे चुकीचे आहे, असेही महातेकर म्हणाले. ‘महातेकर दलित चळवळीतील धडाडीचे अभ्यासू नेते आहेत. मोठ्या प्रतीक्षेनंतर त्यांना मंत्रिपद मिळाले आहे. पीडित लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी करावा. समाजकल्याण खात्याला आलेली मरगळ झटकण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा,’ असे गिरीश बापट म्हणाले. मुक्ता टिळक यांनी प्रास्ताविक केले. दीपक म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले. सुनीता वाडेकर यांनी आभार मानले.