रामदास आठवले शरद पवारांच्या भेटीला; महाविकास आघाडीत जाण्याची चर्चा

ramdas-athawale-meet-sharad-pawar

पुणे :- राज्यसभेच्या आगामी निवडणुकीत केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री आणि आरपीआय (ए) पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना भाजपाकडून राज्यसभेवर पाठवण्याची संधी दिली जाणार नसल्याच्या बातम्या बुधवारी प्रसारमाध्यमांत झळकल्या. त्यानंतर आज आठवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची दिल्लीत भेट घेऊन चर्चा केली.

रामदास आठवले यांचा राज्यसभेचा कार्यकाळ येत्या मार्च महिन्यात संपणार आहे. मात्र भाजपाच्या कोट्यातून रामदास आठवले यांना पुन्हा राज्यसभेत पाठवणे अडचणीचे समजले जात आहे. खासदारकी गमवावी लागल्यास आठवलेंना केंद्रीय मंत्रिपदही सोडावं लागू शकतं. यावेळी आठवलेंना भाजप संधी देणार नाही, अशा बातम्या आहेत. त्याबरोबरच भाजप उदयनराजे भोसले यांना संधी देणार तसेच देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जाणार अशाही चर्चा आहेत. फडणवीस व उदयनराजे ही नावे पाहिली तर आठवलेंवर संक्रांत येऊ शकते. महत्त्वाची बाब म्हणजे यावेळी आठवलेंच्या पक्षाला जागा सोडण्यासाठी भाजप अनुकूल नाही. त्यामुळे आठवलेंना सहजरीत्या राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता मावळली आहे. त्याचा परिणाम म्हणून आठवले यांनी आज थेट दिल्लीत पवारांचे घर गाठले. त्यांच्यात राजकीय चर्चाही झाली. भाजपने संधी दिलीच नाही तर आठवले हे महाविकास आघाडीचा विचार करू शकतात, असा संदेश या भेटीतून देण्यात आल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे.

उदयनराजेंना लवकरच केंद्रात मंत्रिपद; राज्यसभेवर निवड निश्चित