‘खडसेंनी राष्ट्रवादीत आधीच जायला हवं होतं, त्यांनी ‘रिपाइं’त यावं’ – रामदास आठवले

Ramdas Athawale-Eknath Khadse.jpg

मुंबई : पक्षाशी नाराज असलेले भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) लवकरच राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा सुरू असतानाच रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी थेट आपल्या पक्षात येण्याचं आवाहन केलं आहे. खडसेंनी राष्ट्रवादीत आधीच जायला हवं होतं, मात्र आता त्यांनी ‘रिपाइं’मध्ये (RPI) यावं, सरकार आणू, असे विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले.

एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाणार नाहीत. जायचं होतं, तर त्यांनी आधी जायला हवं होतं, ते मंत्री झाले असते. आता राष्ट्रवादी पूर्णपणे भरलेली आहे. राष्ट्रवादीत जाण्यापेक्षा त्यांनी ‘रिपाइं’मध्ये यावं, आपण आपले सरकार आणू, असे रामदास आठवले म्हणाले.

‘शिवसेनेचे खासदार संजय राऊत मला विचारतात की मी कुठे आहे? मी हाथरस इथं जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली, ते गेले का हाथरसला? असा प्रश्न त्यांनी राऊतांना विचारला. हाथरसमधील पीडित कुटुंबीयांची मी भेट घेऊन आलो आहे. आमच्या पक्षाकडून त्यांना पाच लाखांची मदत केली. तसंच अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि त्यांना पुरेशी संरक्षण देण्याबाबत सूचना केली आहे. संजय राऊत विचारत आहेत की, हाथरस मधला बलात्कार झाला तेव्हा मी कुठे होतो. मी एका नटीच्या समर्थनात उतरलो. पण मी कंगनाला मानवतेच्या दृष्टिकोनातून मदत केली, संरक्षण दिले. मी पँथरमधून तयार झालेला कार्यकर्ता आहे. संजय राऊत यांनी मला दलितांबद्दल शिकवू नये. संजय राऊत हे पायल घोषवर झालेल्या अत्याचारावर का बोलत नाहीत? मी नटींच्या गराड्यात नाही तर कायम कार्यकर्त्यांच्या गर्दीत असतो. हे राऊत यांना माहीत नसावं, असंही आठवले म्हणाले.

तसंच, ‘राहुल गांधी यांनी हाथसर येथे राजकारण करण्यासाठी गेले. त्यांनी पीडितेच्या कुटुंबीयांना भेटलं पाहिजे पण फक्त राजकारणासाठी त्याठिकाणी जाऊ नये. राजस्थानमध्ये बलात्कार झाला तिथे राहुल गांधी का नाही गेले. कारण काँग्रेस सरकार तिथं आहे म्हणून जात नाही का? अशोक गहलोतांना राहुल गांधी जाब का विचारत नाहीत? असा सवालही आठवलेंनी विचारला.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार चांगले मित्र आहेत. मी जी भूमिका मांडतो, ती गांभीर्यांने घेतात. त्यामुळे पवार साहेबांना मी काही उत्तर देणार नाही. कोणाला माझी भूमिका आवडत असेल नसेल, असे आठवले म्हणाले.

‘अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या बाबतीत अनेक प्रश्न समोर होते. सीबीआयच्या हातीसुद्धा काही मिळत नाही. ‘एम्स’चा रिपोर्ट आला, याबाबत एम्स हत्या झाली नाही असं बोलू शकत नाही. आम्ही सरकारबाबत कोणतीही रणनीती केली नाही. मुंबई पोलिसांवर विश्वास आहे, मात्र तपास धीम्या गतीने सुरु आहे. आम्ही सरकारच्या विरोधात कुठलेच काम केले नाही. राज्य सरकारला बदनाम करण्यासाठी आम्ही कोणतेही प्रश्न विचारले नाहीत. रियाला जामीन मिळाला ठीक आहे. मात्र इंडस्ट्रीत ड्रग्जचा वापर करु नये’ असंही आठवले म्हणाले. फेक अकाउंटचा तपास करावा, तुम्ही तुमची चाल खेळताय, आम्ही आमची खेळू, पण आम्हीच जिंकणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER