रामदास आठवले यांची राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी

Ramdas Athawale

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडी प्रकरणात एनआयएच्या अटकेत असलेले सचिन वाझे प्रकरणावरून भाजपने (BJP) अधिकच आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यात रक्षकच भक्षक झाल्याचे म्हणत भाजपच्या काही नेत्यांनी राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे. त्यातच आता आरपीआयचे नेते रामदास आठवले (Ramdas Athawale) आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज्यात राष्ट्रपती शासन लागू करण्याची मागणी केली आहे. मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटके  ठेवण्याच्या प्रकरणात सचिन वाझे जे क्राईमचे पोलीस ऑफिसर आहेत, त्यांचे नाव आले.  एनआयएच्या तपासानंतर सचिन वाझेला अटक करण्यात आली.

याच्यामागे मोठा कट असू शकतो, असे  आठवले म्हणाले. मुकेश अंबानी मोठे उद्योगपती आहेत. लाखो लोकांना त्यांनी रोजगारही दिलाय. मुकेश अंबानींचं घर उडवण्यामागे सचिन वाझे तर आहेतच; पण त्याचबरोबर आणखी कोण कोण आहे, याची चौकशी व्हायला हवी. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडत चाललीय. सचिन वाझेसारख्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या अधिकाऱ्याला संरक्षण देण्याचं काम महाराष्ट्र सरकारकडून झालंय. मुंबई पोलिसांनी त्यांचा तपास योग्य पद्धतीने केला नाही. त्यामुळेच एनआयएकडे चौकशी गेली, असंही रामदास आठवले म्हणालेत. एनआयएने सचिन वाझेवर संशय व्यक्त केला आहे.

वाझे यांच्याविरोधात अनेक पुरावे हाती लागल्याचे सांगितले जात आहे. मात्र या सर्वामागे अजून कोणाचा तरी हात असू शकतो. महाराष्ट्रात अशा पद्धतीच्या घटना घडणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे आरपीआयकडून मी मागणी करतो की, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, त्यासाठी मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्रही पाठवत आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती शासन लागू झालं पाहिजे, असंही रामदास आठवलेंनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER