रामदास आठवले हाथरस पीडितेच्या कुटुंबीयांना भेटणार; अत्याचाराविरोधात आझाद मैदानावर आंदोलन

Ramdas Athavale

मुंबई : हाथरसमधील घटनेने पुन्हा हादरवून टाकले आहे. या घटनेचे पडसाद देशभर उमटले आहेत. त्यातच एरवी अभिनेत्रींसाठी मदतीला धावून जाणारे आठवले (Ramdas Athavale ) हाथरस प्रकरणात गप्प का, असा प्रश्न विचारला जात होता. त्यावर आठवले यांनी एक पाऊल पुढे टाकत हाथरस अत्याचाराविरोधात १ ऑक्टोबरला  दुपारी १ वाजता आझाद मैदान मुंबई येथे रिपब्लिकन पक्षातर्फे निषेध आंदोलन करण्यात येणार असून २ ऑक्टोबरला हाथरसमधील पीडित मृत दलित मुलीच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले घेणार आहेत.

उत्तरप्रदेशच्या हाथरस येथे सामूहिक बलात्कार झालेल्या १९ वर्षीय मुलीने उपचारादरम्यान मंगळवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती एएनआयने दिली आहे. या मुलीवर १४ सप्टेंबर रोजी तिच्या शेतात चार माणसांनी तिच्यावर बलात्कार केला होता. दुसर्‍या दिवशी तिला अलिगढ येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने उत्तम वैद्यकीय सुविधांकरिता तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात हलविण्यात आले. पीडित मुलीची प्रकृती चिंताजनक होती. ती व्हेंटिलेटरवर होती.

हाथरसच्या हृदयद्रावक घटनेचे पडसाद आता संपूर्ण भारतात उमटण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा या प्रकरणी राजीनामा मागितला आहे. त्यामुळे देशातले राजकारणदेखील या प्रकरणावरून तापत चालले असल्याचे दिसत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या दिवशी ही मुलगी आपल्या आईसह शेतात गेली होती आणि अचानक गायब झाली.

नंतर ती अत्यंत गंभीर जखमी अवस्थेत आढळून आली. आरोपीने तिचा गळा दाबण्याचा प्रयत्नही केला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. मात्र, पोलिसांनी परस्पर पीडित मुलीच्या कुटुंबीयांना विश्वासात न घेता काल मध्यरात्री २.३० वाजताच्या सुमारास मुलीवर अंत्यसंस्कार केल्याने अजून प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER