भाजपात रामाने केला प्रवेश

पाच राज्यांमध्ये पुढील महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून प्रत्येक पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध उपाययोजना करीत आहे. पाच राज्यांमध्ये निवडणुका असल्या तरी सगळ्यांचे लक्ष पश्चिम बंगालकडे लागलेले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजपात सध्या मोठे युद्ध सुरु आहे. ममता बॅनर्जी यांच्या रॅलीत जय श्रीरामच्या घोषणा दिल्या गेल्याने त्या रागावल्या होत्या. पश्चिम बंगालमध्ये हिंदू मोठ्या प्रमाणावर असून त्यांना ममताचे हे वागणे आवडलेले नाही. त्यातच आता तर भाजपामध्ये रामाने प्रवेश केल्याने पश्चिम बंगालमध्ये वेगळेच चित्र दिसणार आहे. थांबा. कोणत्याही निष्कर्षाप्रत जाऊ नका. राम हा कुठल्याही एका पक्षाचा नाही हे खरे आहे. पण आम्ही ज्या रामाची गोष्ट सांगतोय तो राम आहे छोट्या पडद्यावर गाजलेल्या रामायण मालिकेतील रामाची भूमिका साकारणारा अभिनेता अरुण गोविल. (Arun Govil)

भारतात जेव्हा कलर टीव्हीची सुरुवात झाली तेव्हा रामानंद सागर (Ramanand Sagar) यांनी दूरदर्शनसाठी ‘रामायण’ (Ramayan) या मालिकेची निर्मिती केली होती. ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. रविवारी सकाळी ही मालिका प्रसारित होत असे तेव्हा रस्ते मोकळे पडत असत. सगळी जनता घरात बसून रामायण पाहात असे. या मालिकेत अरुण गोविलने रामाची भूमिका केली होती. अरुण गोविलचा जन्म मेरठमध्ये झालेला असून १९७५ मध्ये तो मुंबईला बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी आला होता. १९७९ मध्ये त्याने राजश्री प्रोडक्शन्सच्या सावन को आने दो सिनेमात काम केले होते. त्याची ही भूमिका प्रेक्षकांना आवडली होती. त्यानंतर रामायणातील रामाची भूमिका करून अरुण गोविल देशातील प्रत्येक घरात पोहोचला होता. अरुण गोविलसह सीता बनलेली दीपिका चिखलिया आणि रावण बनलेला अरविंद त्रिवेदी प्रचंड लोकप्रिय झाले होते. अरविंद त्रिवेदीने नंतर भाजपात प्रवेश करून निवडणूकही लढवली होती. दीपिकानेही भाजपाकडून निवडणूक लढवली होती. तर हनुमान झालेल्या दारा सिंह यांनाही राज्यसभेवर पाठवण्यात आले होते. पण अरुण गोविल मात्र राजकारणापासून दूर होता. मात्र यावेळी तो स्वतःला राजकारणापासून दूर ठेऊ शकला नाही. गुरुवारी दिल्लीमध्ये त्याने एका कार्यक्रमात भाजपाचे सदस्यत्व घेत भाजपात प्रवेश केला.

अरुण गोविलवर भाजप कोणती जबाबदारी देणार आहे ते अजून समोर आलेले नाही. तसेच तो स्टार प्रचारक बनणार का आणि पश्चिम बंगालमध्ये प्रचाराला जाणार का या प्रश्नांची उत्तरेही लगेचच मिळाली नसली तरी लवकरच मिळतील अशी आशा करण्यास हरकत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER