राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार ; अखेर मुहूर्त ठरला

PM Modi - Ram Mandir

नवी दिल्ली : अयोध्येतील बहुप्रतीक्षित राम मंदिर(Ram Mandir) भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचा मुहूर्त अखेर ठरला. पंतप्रधान कार्यालयाकडून ५ ऑगस्ट या तारखेवर सहमती झाल्याची माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन होणार असून हे भूमिपूजन व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे होणार की पंतप्रधान प्रत्यक्ष अयोध्येत जाऊन करणार, यावर अद्याप अंतिम निर्णय बाकी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी २ जुलै रोजी अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन करणार होते.

दिल्लीतून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मोदी भूमिपूजन करणार होते. मात्र भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राम मंदिर ट्रस्टने भूमिपूजन आणि निर्माण कार्याला जून महिन्यात तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे अनिश्चित काळासाठी भूमिपूजन लांबणीवर पडले होते. अखेर श्रावणात राम मंदिर भूमिपूजनाचा मुहूर्त ठरला आहे. ५ ऑगस्ट रोजी सकाळी ८ पासून कार्यक्रमाला सुरुवात होऊ शकते. पंतप्रधान मोदी त्याच दिवशी ११ ते १ या दरम्यान अयोध्येत पोहचू शकतात. पीएमओमधील सूत्रांचे म्हणणे आहे की, त्याची संपूर्ण योजना जवळजवळ तयार झाली आहे. रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या बैठकीत पंतप्रधानांच्या कार्यक्रमावर चर्चा करण्याबरोबरच मंदिराचा नकाशा बदलण्याचा निर्णय घेण्यात आला.

ट्रस्टने ठरविले की, मंदिरात तीनऐवजी पाच घुमट असतील. प्रस्तावित नकाशापेक्षा मंदिराची उंचीदेखील जास्त असेल. बैठकीनंतर ट्रस्टचे सरचिटणीस चम्पत राय यांनी माध्यमांना सांगितले की, कोरोनाची परिस्थिती हाताळल्यानंतर हा निधी गोळा केला जाईल. श्री राम यांचे भव्य आणि दिव्य मंदिर तीन ते साडेतीन वर्षांत तयार होईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER