बाळासाहेब असते तर, आव्हाडांचे हे विधान खपवून घेतले नसते

RAM kadam-awahad-thackeray

मुंबई : ‘हिंदू आपल्या पूर्वजांचे अंत्यसंस्कार कोठे झाले, हे सांगू शकत नाही, मात्र मुस्लिम सांगू शकतो. कारण, त्यांचे हक्काचे कब्रस्तान आहे’, तो आपल्या आजोबांचे, पणजोबांचे दफन कोणत्या कब्रस्तानात झाले, असे हक्काने सांगू शकतो, असे वादग्रस्त वक्तव्य राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी १८ जानेवारीला भिवंडी येथे संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने आयोजित जाहीर सभेत केले होते. आता जितेंद्र आव्हाडांच्या या विधानावर भाजप आमदार राम कदम यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. जितेंद्र आव्हाडांचे हे विधान दुर्दैवी असून त्यांनी हे विधान मागे घ्यावे. तसेच, अशा नेत्याचा ठाकरे सरकारने तात्काळ राजीनामा घ्यावा, अशी मागणी राम कदम यांनी केली आहे. इतकंच नव्हे तर राम कदम यांनी शिवसेनेवरही टीका केली.

जितेंद्र आव्हाडांनी जे विधान केलं, ते अत्यंत दुर्दैवी आहे. मुस्लिम समाजाला खूश करण्यासाठी त्यांनी जे वक्तव्य केलं, त्यातून केवळ हिंदू धर्म नव्हे, तर मुस्लिम समाजसोडून ज्या-ज्या धर्मामध्ये अंत्यविधी दफनविधीचा होत नाही, त्या धर्मांचा अपमान केला आहे. आव्हाडांनी समस्त हिंदू धर्माची माफी मागितली पाहिजे. वक्तव्य मागे घेतलं पाहिजे. असेही कदम म्हणाले.

तर शिवसेनेवर निशाणा साधतांना ते म्हणाले की, हिंदूत्वाची भाषा बोलणारी शिवसेना, उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री दिवसाढवळ्या हिंदूंचा जाहीर अपमान करतो आणि बाळासाहेब ठाकरेंची हिंदुत्वाची भाषा करणारी शिवसेना गप्पा का? बाळासाहेब जिंवत असते, तर त्यांनी हे खपवून घेतले नसते. अशा नेत्याचा ताबडतोब राजीनामा घेतला पाहिजे, असं संतापजनक प्रतिक्रिया राम कदम यांनी दिली.