मंदिर वही बनाएंगे… राममंदिराचा लढा – १: प्रकटले राम अन्…

अयोध्येतील रामजन्मभूमी हा देशविदेशातील कोट्यवधी हिंदूंच्या अस्मितेचा विषय. कोट्यवधी रामभक्तांच्या भावना अयोध्येशी जुळलेल्या आहेत. ५ ऑगस्टला राजजन्मभूमीच्या जागेवर अतिभव्य राम मंदिर उभारणीसाठीचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. रामजन्मभूमीच्या छातीवर बांधलेली बाबरी मशीद ही हिंदूंच्या इस्लामिक गुलामीची निशाणी. ही निशाणी कायमची मिटवावी आणि भव्य दिव्य मंदिर बनावे यासाठी लाखो रामभक्तांनी संघर्ष केला, अनेकांनी प्राणांची आहुती दिली, लाठ्याकाठ्या झेलल्या, तुरुंगात गेले. या सर्वांच्या बलिदान आणि त्यागाचे चीज होण्याचा दिवस आता जवळ आलेला असताना हे सिंहावलोकन. रामजन्मभूमीचे आणि त्यासाठी झालेल्या तीव्र संघर्षाचेही…


२२ डिसेंबर १९४९ रोजी एक चमत्कार झाला. अयोध्येतील रामजन्मभूमीच्या सुरक्षेसाठी तैनात एका शिपायाला मध्यरात्रीनंतर एक लखलखता प्रकाश जन्मभूमीच्या ठिकाणातून येताना दिसला. त्या दिव्य प्रकाशात त्यांना बालराम साक्षात दिसले. बाल्यावस्थेतील प्रभू रामाचे दर्शन शेकडो भक्त करीत आहेत असे दृश्य त्या दिव्य प्रकाशात त्याने याचि देही याचि डोळा अनुभवले. त्या दिवसापासून रामभक्तांनी रामचबुतऱ्यावर अखंड कीर्तन प्रारंभ केले जे ६ डिसेंबर १९९२ पर्यंत अव्याहत सुरू होते. ६ डिसेंबरला बाबरी मशीद पाडल्यानंतर ती जागा सरकारने ताब्यात घेतल्याने अखंड कीर्तनाची जागा बदलली गेली; पण ते आजही अयोध्येत सुरूच असते.

ही बातमी पण वाचा:- राम मंदिरासाठी मुगल सम्राटांचे वंशज एक किलो सोन्याची वीट अर्पण करण्यास इच्छुक

अयोध्येत साक्षात प्रभू राम प्रकटल्याची वार्ता सगळीकडे वाऱ्यासारखी पसरल्यानंतरच्या घटनाक्रमाची प्रतिक्रिया मुस्लिम समाजात उमटेल आणि काही ना काही विरोधही ते करतील ही शक्यता लक्षात घेऊन २९ डिसेंबर १९४९ रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी कृष्णकुमार नायर यांनी ती जागा वादग्रस्त जाहीर करून तेथे जमावबंदीचा आदेश लागू केला. केवळ चार पुजारी आणि एक भंडारी यांना आत जाण्याची अनुमती देण्यात आली. तसेच फैजाबादचे तत्कालीन नगराध्यक्ष के.के.राम वर्मा यांना रिसिव्हर म्हणून नियुक्त करण्यात आले. वादग्रस्त वास्तूपासून ५०० मीटरपर्यंतच्या परिसरात मुस्लिमांना प्रवेश नसेल असेही स्पष्ट करण्यात आले. राम मंदिर आंदोलनाचा प्रारंभ म्हणून १९८३ मध्ये उत्तरप्रदेशातील मुजफ्फरपूर येथे आयोजित विराट हिंदू संमेलनाचा उल्लेख करावाच लागेल. उत्तरप्रदेशचे माजी मंत्री दाऊदयाल खन्ना त्या संमेलनात हजर होते. ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते आणि मुरादाबादमधून पाच वेळा विधानसभेवर निवडून गेले होते. खन्ना यांनी त्या संमेलनात अयोध्येतील रामजन्मभूमी, मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी आणि वाराणसीतील काशी विश्वनाथाच्या मंदिराच्या जागी बनलेल्या मशिदी म्हणजे हिंदू स्वाभिमानास आव्हान असून त्यापासून या वास्तू मुक्त करण्याचा मुद्दा अतिशय प्रखरपणे मांडला.

तेथे उपस्थित जनसमुदायाला या गोष्टीची कल्पना नव्हती; पण त्याच संमेलनात रामजन्मभूमी आंदोलनाची बीजे रोवली गेली. तिन्ही स्थाने मुक्त करण्यासाठीचा संकल्प या संमेलनात सोडला गेला. पहिली धर्मसंसद दाऊदयाल खन्ना यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे विश्व हिंदू परिषदेचे एक शिष्टमंडळ सत्यशोधनासाठी तिन्ही ठिकाणी गेले. त्या शिष्टमंडळाचे नेतृत्व अशोक सिंघल यांनी केले. अशोकजी पुढे रामजन्मभूमी आंदोलनाचे एक प्रमुख नेते बनले. एप्रिल १९८४ मध्ये दिल्लीच्या विज्ञान भवनात एक राष्ट्रीय संमेलन झाले. ती पहिली धर्मसंसद होती.

हिंदूंच्या श्रद्धेची तिन्ही स्थाने मुक्त करण्यासंदर्भातील ठराव त्या धर्मसंसदेत एकमताने पारित करण्यात आले. त्याच धर्मसंसदेत श्रीरामजन्मभूमी मुक्ती यज्ञ समितीची स्थापना करण्यात आली. अयोध्येतील रामजन्मभूमीला लागलेले कुलूप उघडावे यासाठी बिहारमधील सीतामढी येथून श्रीराम-जानकी रथयात्रा प्रारंभ करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. ही रथयात्रा नियोजित वेळेनुसार निघाली; मात्र ती दिल्लीत पोहचण्यापूर्वीच तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची अतिरेक्यांनी हत्या केली आणि दिल्लीसह देशात शीख बंधूंचे हत्यासत्र सुरू झाले. त्यामुळे समितीने आपले आंदोलन एक वर्षासाठी पुढे ढकलले. ऑक्टोबर १९८५ मध्ये कर्नाटकातील उडिपी येथे दुसरी धर्मसंसद झाली आणि तीत, रामजन्मभूमीला लागलेले टाळे खोला, असा इशारा सरकारला देण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER