नाथाभाऊंच्या पक्षांतरानंतर भाजपच्या पहिल्याच बैठकीत रक्षा खडसे गैरहजर, चर्चेला उधाण

Eknath Khadse - Raksha Khadse

जळगाव : ४० वर्षे पक्षाचं काम केल्यानंतर जेष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजपला (BJP) रामराम ठोकला. खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केल्यानंतर जळगाव (Jalgaon) जिल्हा भाजपच्या (BJP) कोअर कमिटीची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) गैरहजर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर डॅमेज कंट्रोलची चाचपणी करण्यासाठी ही बैठक होत असल्याची माहिती आहे.

भाजपच्या जळगाव जिल्हा कोअर कमिटीच्या बैठकीसाठी माजी मंत्री गिरीश महाजन, प्रांत संघटन मंत्री विजय पुराणिक, विभागीय संघटन मंत्री किशोर काळकर, खासदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे, संजय सावकारे, मंगेश चव्हाण, माजी आमदार स्मिता वाघ, महापौर भारती सोनवणे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील आदी नेते उपस्थित आहेत.

भाजपच्या या तातडीच्या बैठकीला माध्यमांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. बैठकीचे कारण अद्याप अस्पष्ट असून पक्षसंघटनेच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी बैठक होत असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. मात्र आता रक्षा खडसे गैरहजर असल्याने चर्चेला उधाण आले आहे.

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांनी भाजपमध्येच राहणार असल्याचे जाहीर केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे त्यांच्या मूळगावी कोथळी येथे आल्यानंतर रक्षा खडसे यांनी त्यांचे स्वागत केले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER