फार्म हाऊसवर रमली आहे राखी

Rakhi

गेल्या काही वर्षांपासून प्रख्यात अभिनेत्री राखी (Rakhi) लाईमलाईटपासून दूर आहे. ती कुठे आहे काय करतेय याची माहिती कोणालाही नाही. मात्र आम्ही तुम्हाला सांगतो सध्या राखी कुठे आहे ते? राखी सध्या तिच्या पनवेल येथील फार्महाऊसवर शेती करीत जीवन जगत आहे. आता तुम्ही म्हणाल राखी आणि शेती. हो तुम्ही जे वाचले ते अगदी खरे आहे. राखीच्या फार्म हाऊसवर अनेक दुभती जनावरेही आहेत.

राखी शेती का करू लागली याची कथा वाचण्यासारखी आहे. राखीचा जन्म 15 ऑगस्ट 1947 ला पश्चिम बंगाल येथील राणाघाट येथे झाला. विसाव्या वर्षीच राखीने राजश्री प्रॉडक्शनच्या ‘जीवन मृत्यु’ चित्रपटातून रुपेरी पडद्यावर आगमन केले होते. राखीचा हा पहिलाच चित्रपट प्रचंड यशस्वी झाला होता. यानंतर राखीने अनेक हिट चित्रपट दिले. राखीने प्रख्यात गीतकार, निर्माते, दिग्दर्शक गुलजार यांच्यासोबत लग्न केले. त्यांना मेघना नावाची मुलगीही आहे. मेघनाही चित्रपटसृष्टीत कार्यरत असून दिग्दर्शिका म्हणून तिने नाव कमवले आहे. तर मुद्दा राखीचा.

राखीला लहान असल्यापासूनच शेती करण्याची आवड होती परंतु चित्रपटात काम करू लागल्याने शेतीपासून दूर राहावे लागले होते. निसर्गाच्या जवळ राहाणे हे राखीला फार आवडते. जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा राखी जंगलात फिरायला जात असे. निसर्गाच्या सानिध्यात राहायला राखीला खूप आवडते. त्यामुळेच राखीकडे जेव्हा पैसा आला तेव्हा तिने पनवेल येथे भले मोठे फार्म हाऊस घेतले. मुंबईतील गोंधळ, गर्दी आणि प्रदूषण राखीला आवडत नाही. गर्दीमुळे तिला घाबरल्यासारखे होते. त्यामुळेच चित्रपटातून दूर झाल्यानंतर राखीने फार्म हाऊसवरच राहाण्याचा निर्णय घेतला आणि गेल्या काही वर्षांपासून ती तेथेच राहात आहे. राखी आता पूर्णपणे शेतकरी झाली असल्याचे सांगितले जाते. राखीने फार्महाऊसमध्ये विविध प्रकारच्या भाज्या उगवल्या आहेत. एवढेच नव्हे तर फार्म हाऊसवर गाय, बैल, शेळ्या, कोंबड्या असे प्राणी पक्षीही राखीने पाळलेले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER