
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. मात्र, अद्याप यावर तोडगा निघाला नसल्याने आता शेतकरी संघटनांकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून संयुक्त किसान मोर्च्याने दिल्ली वगळून उद्या देशभर चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. उद्या दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत हे चक्का जाम आंदोलन होणार आहे.
देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवर हे आंदोलन केलं जाणार आहे. यावेळी वाहतूक कोंडीत अडकलेल्या लोकांची शेतकरीच काळजी घेणार आहेत. वाहतूक कोंडीत अडकलेल्यांसाठी मोफत जेवण आणि पाणी देण्याची व्यवस्था शेतकरी करणार आहेत. दिल्ली, उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये उद्या ‘चक्का जाम’ होणार नाही. शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी शुक्रवारी सांगितले की, जे लोक या ठिकाणी (शेतकरी आंदोलनात) येऊ शकले नाहीत, ते आपापल्या ठिकाणी शांतपणे चक्का जाम करतील. हा चक्का जाम दिल्लीत होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. याचबरोबर, उद्या उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्येदेखील चक्का जाम आंदोलन केले जाणार नाही. दिल्ली सोडून देशाच्या अन्य भागांतील रस्ते बंद केले जातील. कारण, कधीही दिल्लीला बोलाविले जाऊ शकते. त्यामुळे त्यांना स्टॅण्डबाय ठेवले आहे, असे राकेश टिकैत म्हणाले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला