उद्धवा, अजब तुझे सरकार! – राजू शेट्टींचा घणाघात

Raju Shetty targeted CM Uddhav Thackeray

मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी काल बारामतीत दूध दरवाढीच्या मागणीवरून धडक मोर्चा काढला. मात्र मोर्चाला परवानगी नसतानादेखील कोरोना काळातील नियमांचे उल्लंघन करत गर्दी जमवल्याच्या आरोपावरून शेट्टी यांच्यासह जवळपास ४० कार्यकर्त्यांविरोधात बारामतीत गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत शेट्टी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला .

ही बातमी पण वाचा:- दूधदरवाढीवरून शरद पवारांसोबत चर्चा पण मुख्यमंत्री ‘मातोश्री’ बाहेरही पडत नाही : शेट्टी

उद्धवा अजब तुझे सरकार…असे ट्विट करत, दुग्धविकास मंत्र्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कधी दाखल करता? असा सवालही उपस्थित केला.

दूध दरवाढीसाठी काढलेल्या मोर्च्यात गाईचा छळ केला म्हणून माझ्यासह कार्यकर्त्यांच्यावर गुन्हा दाखल करता. मग रेवनाथ काळे या राहुरीच्या शेतकऱ्याने दुधाला भाव नसल्याने आत्महत्या केली. या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या दुग्धविकास मंत्र्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कधी दाखल करता? असे ट्विट शेट्टी यांनी केले आहे.यासोबतच त्यांनी एक व्हिडीओही शेयर केला असून आपल्या आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली .

महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकरी गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून, सातत्याने आंदोलन करत आहे. उत्पादन खर्चापेक्षा १५ रुपये कमी दराने तो दूध विकत आहे. त्यावेळी कुणाला दया आली नाही. अनेक दूध उत्पादकांनी दुधाचा धंदा परवडत नाही, म्हणून आत्महत्या केल्या. त्या आत्महत्यांना जबाबदार म्हणून राज्याच्या दुग्धविकास मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असे पोलिसांना वाटले नाही. परंतू , परवानगी नसताना मोर्चा काढला म्हणून जर का आमच्यावर गुन्हा दाखल होत असेल, तर होय आम्ही गुन्हा केलेला आहे. पोलिसांना जे काय करायचे ते करावे , सरकारला जे काय करायचे ते करावे. अजूनही आम्ही गप्प बसणार नाही. जोपर्यंत दूध उत्पादकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत पुन्हा पुन्हा कायदा हातात घेऊन आम्ही आंदोलन करणार, असे शेट्टी व्हिडीओमध्ये म्हणाले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER