‘करून दाखवले’ होर्डिंग लावले कशाला? राजू शेट्टींचा उद्धव ठाकरेंना टोमणा

Raju Shetty criticize CM Uddhav Thackeray

सांगली :- घोषित कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना होणारच नसेल तर ‘करून दाखवले’ असे होर्डिंग कशाला लावले? असा टोमणा शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरे यांना मारला आहे.

ठाकरे सरकारने घोषित केलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर अनेक जण टीका करत आहेत. शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यावरून वरीलप्रमाणे सुनावले आहे.

मोदींच्या योजनांना विरोध केला तर राज्य सरकार उलथवून टाकू – फडणवीस

सांगलीत राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शेतकरी कर्जमुक्ती मेळावा झाला. शेतकऱ्यांनी ८ जानेवारीच्या देशव्यापी बंदमध्ये सरसकट कर्जमाफीसाठी सहभागी होऊन सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालावे, असे आवाहन शेट्टी यांनी केले.

राजू शेट्टी यांनी राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेवर मेळाव्यात जोरदार टीका केली. खऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार नसून ज्यांनी शेती सोडली आहे, अशा कर्जधारकांना होणार असल्याचा आरोप त्यांनी केला. प्रत्यक्षात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना फायदा होणार नसेल तर, गावोगावी ‘करून दाखवले’ होर्डिंग लावण्यात काय अर्थ आहे, असे शेट्टी म्हणाले.

राजू शेट्टी म्हणाले, खरीप हंगामातील सर्व पिके गेल्या वर्षी वाया गेली आहेत. शेतकऱ्यांचे अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि महापूर यामुळे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीपासून एकही शेतकरी वाचू शकला नाही. ज्या शेतकऱ्यांनी सप्टेंबरमध्ये कर्ज घेतले ते शेतकरी जून २०२० ला थकबाकीदार होणार आहेत. या शेतकऱ्यांना सरकारला दिलासा द्यायचा असेल तर, शेतकऱ्यांचे चालू पीक कर्ज माफ करा, अशी मागणी त्यांनी केली.