राजू शेट्टी यांचा ऊर्जा मंत्र्यावर हल्लाबोल

Raju Shetti - Nitin Raut

कोल्हापूर : लॉकडाऊन (Lockdown) काळातील वीजबिलात सवलत मिळावी या सर्वसामान्य ग्राहकांच्या मागणीला राज्यातील महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi) वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी, ‘वीजग्राहकांना लॉकडाऊन काळातील वीज बिलात सवलत दिली जाणार नाही. मीटर रिडींगनुसार वीज बिल भरावे लागेल. राज्य सरकारने वीज बिल सवलतीसाठी केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव पाठविला होता, मात्र केंद्राने मदत केली नाही. त्यामुळे लॉकडाऊन कालावधीतील वीजबिलामध्ये माफी नाही’ असे स्पष्ट केले. दरम्यान राज्य सरकारच्या या धोरणावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी हल्लाबोल केला.

लॉकडाऊन काळातील घरगुती वीज बिले कदापि भरणार नाही, सरकारने सक्तीने वसूल केल्यास तीव्र पडसाद उमटतील. ऊर्जामंत्री नितिन राऊत यांना अधिकार नसतील तर त्यांनी पोकळ घोषणा करू नयेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारून मगच घोषणा करावी. ऊर्जामंत्र्यांनी यापुढे कोणतीही घोषणा करताना वरिष्ठांची परवानगी घ्यावी, मगच आश्वासने द्यावीत,’ल असा टोला माजी खासदार शेट्टी यांनी लगाविला.

लॉकडाऊन काळातील वीज बिलामध्ये माफी मिळावी यासाठी विविध संस्था, संघटना व राजकीय पक्षांनी आंदोलने केली होती. मंत्र्यांना निवेदने दिली होती. मात्र ऊर्जामंत्री राऊत यांनी वीजमाफी शक्य नाही असे स्पष्ट केले. मंत्री राऊत म्हणाले, ‘लॉकडाऊन कालावधीत महावितरण कंपनीने अखंडित वीज पुरवठा केला. ग्राहकांनी वीजेचा वापर केला आहे. ग्राहकांनी वीज बिले भरावीत.’

राज्य सरकारच्या या धोरणावर टीकास्त्र सोडताना माजी खासदार शेट्टी म्हणाले, ‘ लॉकडाऊनमध्ये सगळं काही बंद होते. कुणाच्या हाताला कामे नव्हती. गोरगरीबांकडे पैसा नाही. ही वीज बिले भरायची कशी ? लोकांच्याकडे पैसे नाहीत म्हणून लॉकडाऊनच्या काळातील घरगुती वीज बिले माफ करावीत अशी आमची माफक मागणी आहे. केंद्र सरकारने काहीसे पॅकेज दिले, मात्र राज्य सरकारने कोणत्याही प्रकारचा दिलासा दिलेला नाही. सरकारने त्वरीत वीज बिले माफ करावीत,अन्यथा रस्त्यावर उतरून सरकारशी दोन होत करू.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER