सरकार अदानी अंबानीचे राखणदार आहे का ?; मोर्चा अडवल्याने शेट्टींचा संतप्त प्रश्न

Raju Shetty

मुंबई :- केंद्र सरकारने शेतक-यांवर नवीन कृषी कायदे लादल्याने शेतकरी संतप्त झाला आहे. हे कायदे मागे घेण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून पंजाबचा शेतकरी राजधानीत तळ ठोकून आहे. दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ राज्यातील हजारो शेतकऱ्यांनी मंगळवारी मुंबईत मोर्चा काढला. पण हा मोर्चा वांद्रे-कुर्ला संकुलातील अदानी (Adhani) आणि रिलायन्स कंपनीच्या कार्यालयावर पोहोचू शकला नाही. हा मोर्चा पोलिसांनी अडविल्यामुळे ठाकरे सरकार हे अदानी-अंबानींचे राखणदार आहे काय, असा संतप्त सवाल स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केला आहे.

मुंबईतील वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयापासून सकाळी ११ वाजता मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चात सुमारे आठ हजार शेतकरी होते, असे आंदोलकांचे म्हणणे आहे.

या मोर्चात मोदी-अदानी मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या जात होत्या. मोर्चा पुढे जाऊ नये यासाठी पोलिसांनी अडवणूक केली. शेवटी मोठा वाद झाल्यानंतर मोर्चा मार्गस्थ झाला. वांद्रे-कुर्ला संकुलातील गुरुनानक चौकात मोर्चा पोलिसांनी रोखला. तेथून अदानी आणि रिलायन्सच्या जिओ कंपनीचे कार्यालय जवळ होते. यावेळी शेतकऱ्यांनी जिओ कंपनीच्या सिमकार्डची रस्त्यावर होळी केली.

आम्ही दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढला आहे. आमचा मोर्चा शांततेत आहे. तरी ठाकरे सरकारने इतका अभूतपूर्व पोलिस बंदोबस्त कशासाठी ठेवला, असा सवाल शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी विचारला. प्रहार संघटनेचे अध्यक्ष व राज्यमंत्री बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी मोर्चात सामील होऊ नये म्हणून त्यांना नागपुरात रोखल्याबाबत शेट्टी यांनी नाराजी प्रकट केली. ठाकरे सरकारला अदानी-अंबानी या उद्योजकांचा इतका पुळका कशासाठी असा संतप्त सवालही शेट्टी यांनी मोर्चेकऱ्यांसमोर बोलताना केला.

दिल्लीतील शेतकरी आंदोलक एकटे नाहीत, हे दाखवण्यासाठी मोर्चा काढल्याचे शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील म्हणाले.

ही बातमी पण वाचा : मती, गती आणि प्रगती असे हे सरकार , बारामती नव्हे : उद्धव ठाकरे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER