राजू शेट्टी महाविकास आघाडीला सोडचिठ्ठी देणार? पंढरपुरात राष्ट्रवादीच्या चिंतेत भर

Raju Shetti

मुंबई : पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये (Pandharpur Assembly by-election) राष्ट्रवादीच्या(NCP) चिंतेत भर पडण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये सरळ सामना होणार आहे. मात्र या निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपला उमेदवार रणांगणात उतरवला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगिरथ भालके यांच्यासमोरील अडचणीत वाढ झाली आहे. आता खुद्द स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti ) आपला उमेदवार विजयी करण्यासाठी मतदारसंघामध्ये मुक्कामाला आहे.

राष्ट्रवादीकडून दिवंगत भारत नाना भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. तर, भाजपने भगीरथ भालके यांच्या विरोधात समाधान आवताडे मैदानात उतरवलं आहे. भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात मुख्य सामना होणार आहे.

परंतु आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेदेखील या निवडणुकीत उडी घेतली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून स्वाभिमानीचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. ही बंडखोरी शमवण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची शिष्टाई यशस्वी ठरू शकलेली नाही. राजू शेट्टी हे लवकरच महाविकास आघाडीतून बाहेर पडतील अशी शक्यता वर्तवली जाते आहे. एवढंच नाही तर रविवारीच यासंदर्भातली घोषणा केली जाईल अशीही माहिती समोर येते आहे.

या पोटनिवडणुकीच्या प्रचारात राजू शेट्टी हे आक्रमकपणे भाजपसह महाविकास आघाडीलाही घेरणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना एफआरपी द्यावी आणि १०० युनिटपर्यंत घरगुती वीज बिल माफ करावे. शेतकरी संघटना आता सरकारच्या अपयशावर बोट ठेवणार आहे, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील आमच्या मागण्यांचा विचार करण्याबाबत बोलतात. मात्र आधी शेतकऱ्यांची एफआरपी द्या आणि घरगुती वीज बिल माफ करा. राष्ट्रवादी काँग्रेसनं शेतकऱ्यांचे पैसे बुडवणाऱ्या या साखर कारखानदाराला उमेदवारी देताना आम्हाला विचारात घेतले होते का? असा सवाल करत राजू शेट्टी यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीमधील दोन उमेदवार साखर कारखानदार आहेत. त्यांनी शेतकऱ्यांचे पैसे थकवले आहेत. त्यांच्याकडे निवडणूक लढवायला पैसे आहेत. पण शेतकऱ्यांसाठी पैसे नाहीत हे दुर्दैव आहे, असा हल्लाबोल राजू शेट्टी यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button