राजू शेट्टींची मागणी अजित पवारांकडून तत्काळ मान्य

Ajit Pawar - Raju Shetti

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) आणि सांगली (Sangli) या जिल्ह्यांमध्ये कोरोना (Corona) रुग्णांची संख्या अधिकच वाढत चालली आहे. राज्य सरकारने तातडीने या दोन जिल्ह्यांकडे विशेष लक्ष घालून व्हेंटिलेटरची सुविधा पुरवावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे केली आहे.

या मागणीला अजित पवारांनीही होकार दिला असून, येत्या चार दिवसांत कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत व्हेंटिलेटरसहित अतिदक्षता विभागासाठी बेड पुरवू, असे आश्वासन अजित पवार यांनी शेट्टी यांना दिले आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव अधिकाधिक वाढत चालला आहे. व्हेंटिलेटर उपलब्ध होत नसल्याने रुग्ण दगावत आहेत. त्यातच या दोन्ही जिल्ह्यांत  आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्याही कमी आहे. मुंबईमध्ये कोरोनाचा संसर्ग कमी होत आहे. तेथील व्हेंटिलेटर सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांसाठी उपलब्ध करून द्यावे. तसेच खासगी रुग्णालयातही बेड अपुरे पडत आहेत. ऑक्सिजनची पातळी खालावल्यास रुग्णांना तातडीने बेड मिळत नाहीत.

त्यामुळे व्हेंटिलेटरअभावी रुग्ण दगावत आहेत. परिणामी सांगली जिल्ह्यातील मृत्युदर सर्वाधिक झाला आहे. ही परिस्थिती नियंत्रणात यावी म्हणून गेले दोन दिवस मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी संपर्क साधतो आहे, असं राजू शेट्टी म्हणाले. कोल्हापूर जिल्ह्यात ३०० व सांगली जिल्ह्यात १५० बेड्सचा प्रस्ताव गेला आहे. त्यास राज्य सरकारने तातडीने मान्यता द्यावी, अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात वेगाने पसरणाऱ्या कोरोनावर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात तसेच इचलकरंजी शहरातदेखील रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. दोन्ही जिल्ह्यांत  विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कोविड सेंटरना बुधवारी मान्यता देऊन येत्या चार दिवसांत व्हेंटिलेटरसह आयसीयू बेड्सची सुविधा उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन अजित पवार यांनी शेट्टी यांना दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER