राजू शेट्टी यांनी मराठा आरक्षणासंदर्भात ठाकरे सरकारकडे केली ‘ही’ मागणी

Raju Shetty

मुंबई : मराठा समाजातील (maratha-reservation) विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून राज्य शासनाने तत्काळ सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी आणि तोपर्यंत अध्यादेश काढून प्रवेश प्रक्रिया आरक्षणानुसार सुरळीत चालू करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी केली आहे. ‘मराठा हा बहुसंख्य समाज शेतकरी आहे.

शेतीची परिस्थिती दयनीय झाली आहे. मुलांची फी भरण्याची आर्थिक कुवत शेतकऱ्यांमध्ये नाही. आरक्षण मिळालं तर त्यांना फी सवलत किंवा शिष्यवृत्ती मिळेल. त्यामुळे अर्धवट शिक्षण सोडण्याची वेळ मराठा समाजातील विद्यार्थ्यांवर येणार नाही. म्हणून आज महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची पुनर्विचार याचिका तत्काळ दाखल करावी व तोपर्यंत अध्यादेश काढून मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा. ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आग्रही मागणी आहे, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

दरम्यान शिक्षण आणि नोकऱ्यांमधील मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्थगिती दिली. मात्र, या आरक्षणाचा आधीच मिळालेला लाभ अबाधित राहणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. हे प्रकरण अधिक न्यायाधीशांच्या पीठाकडे वर्ग करण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारवर टीका करण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER