राजीव गांधी फाउंडेशनसह इतर दोन फाउंडेशनच्या चौकशीसाठी समिती स्थापन होणार

Sonia And Rahul Gandhi

नवी दिल्ली :- भारत-चीन सीमावादानंतर राजीव गांधी फाउंडेशनला २००५-०६ दरम्यान चीनकडून झालेल्या फंडिंगबाबत भाजपने प्रश्न उपस्थित केले होते. आता या प्रकरणी गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी गृह मंत्रालयाची समिती नेमण्यात आली आहे. ही समिती गांधी कुटुंबीयांच्या संबंधित राजीव गांधी फाउंडेशन, राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट, इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट या सर्व संस्थांच्या कारभाराची चौकशी करणार आहे.

ईडीचे स्पेशल डायरेक्टर या समितीचे प्रमुख असणार असून त्यांच्या अध्यक्षतेखाली ही कमिटी स्थापन करण्यात येणार आहे. पीटीआयनं यासंबंधीचं वृत्त दिलं आहे. राजीव गांधी फाउंडेशननं परदेशातून विशेषतः चीनकडून देणग्या घेताना पीएमएलए, आयकर कायदा, एफसीआरए या कायद्यातील विविध नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे. ही माहिती पुढे आल्यानंतर केंद्र सरकारनं तपास करण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयानं संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी आंतर मंत्रालयीन समितीची स्थापना केली आहे. परदेशातून स्वीकारण्यात आलेल्या देणग्यासंदर्भात केंद्र सरकार राजीव गांधी फाउंडेशनबरोबरच इतर दोन फाउंडेशनचीही चौकशी करणार असल्याचं वृत्त आहे. यात राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट व इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट यांचा समावेश आहे. आंतर मंत्रालयीन समितीच या तिन्ही संस्थांच्या देणग्यासंदर्भातील चौकशी करणार आहे.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी २१ जून १९९१ साली सोनिया गांधी यांनी या फाऊंडेशनची सुरुवात केली होती. हे फाउंडेशन शिक्षण, विज्ञान आणि टेक्नॉलॉजीचे प्रमोशन, वंचित-शोषित आणि दिव्यांगांच्या प्रगतीसाठी कार्य करते. डोनेशनच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशांवरच या संस्थेचे कामकाज चालते. सोनिया गांधी या संस्थेच्या अध्यक्ष असून डॉ. मनमोहनसिंग, राहुल गांधी व प्रियंका गांधी या फाउंडेशनच्या ट्रस्टी आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER