रजनीकांतचा जावई धनुष ‘कॅप्टन अमेरिका’बरोबर हॉलिवूडपटात

The Gray Man

अॅव्हेंजर्स ही हॉलिवुडमधील (Hollywood) गाजलेल्या चित्रपटांची श्रृंखला आहे. यात कॅप्टन अमेरिका हे पात्र प्रचंड लोकप्रिय आहे. प्रख्यात अभिनेता ख्रिस इव्हान्सनेही (Chris Evans) ही भूमिका साकारली आहे. ख्रिसचा कॅप्टन अमेरिका (Captain America) केवळ हॉलिवुडमध्येच नव्हे तर जगभरात प्रशंसेस पात्र ठरलेला आहे. अशा या प्रचंड लोकप्रिय कलाकाराबरोबर म्हणजेच ख्रिस इव्हान्सबरोबर काम करण्याची संधी साऊथचा सुपरस्टार रजनीकांतचा जावई धनुषला मिळाली आहे. धनुषचा (Dhanush) हा दुसरा हॉलिवुडपट आहे. स्वतः धनुषनेच सोशल मीडियावर त्याच्या या नव्या सिनेमाविषयी माहिती दिली आहे.

‘अॅव्हेंजर्स एंडगेम’चे दिग्दर्शक रूसो ब्रदर्सनी एक स्पाय थ्रिलर ‘द ग्रे मॅन’ची निर्मिती करण्याचे ठरवले आहे. २००९ मध्ये आलेल्या मार्क ग्रेनेची कादंबरी ‘द ग्रे मॅन’वर हा सिनेमा आधारित आहे. अँथोनी रूसो आणि जोइ रूसो हे या सिनेमाची निर्मिती करीत असून ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’चे स्क्रीन रायटर क्रिस्टोफर मार्कस आणि स्टीफन मॅकफीली यांनी या सिनेमाची स्क्रिप्ट लिहिली आहे. जानेवारीमध्ये या चित्रपटाचे या सिनेमात ख्रिस इव्हान्स, रयान गॉस्लिंग, अॅना डे, जेसिका हेनविक, वॅगनर मॉरा आणि जूलिया बटर्सही काम करणार आहेत. या कलाकारांसोबत एक महत्वाची भूमिका साकारण्यासाठी धनुषला साईन करण्यात आले आहे. रुसो ब्रदर्सनी सोशल मीडियावर या सिनेमाची घोषणा केली आहे.

‘द ग्रे मॅन’ हा धनुषचा दुसरा हॉलिवूड सिनेमा असणार आहे. धनुषने यापूर्वी 2018 मध्ये केन स्कॉट दिग्दर्शित ‘द एक्स्ट्रा ऑडिनरी जर्नी ऑफ फकीर’मध्ये मुख्य भूमिका साकारली होती. रोमेन प्यूर्टोलासची कादंबरी ‘द एक्स्ट्रा ऑडिनरी जर्नी ऑफ द फकीर’वर हा सिनेमा आधारित होता. हा सिनेमा समीक्षकांनी डोक्यावर घेतला होता. भारतात हा सिनेमा गेल्या वर्षी जूनमध्ये रिलीज झाला होता. त्यानंतर आता धनुष द ग्रे मॅनमध्ये दिसणार आहे, हा एक भव्य आणि महागडा सिनेमा असणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘द ग्रे मॅन’ 200 दशलक्ष यूएस डॉलर्स म्हणजेच जवळपास १५०० कोटींचे बजेट असलेला असणार आहे. सिनेमातील धनुषच्या भूमिकेबाबत मात्र गुप्तता पाळली गेली आहे. पुढील महिन्यापासून या सिनेमाचे लॉस एंजिल्स येथे शूटिंग सुरू होणार आहे.

धनुषने साऊथमध्ये अनेक हिट सिनेमे दिले असून हिंदीतही तो काही सिनेमात दिसला होता. यात ‘रांझणा’ आणि अमिताभसोबतच्या ‘शमिताभ’ सिनेमाचा समावेश आहे. सध्या धनुष अक्षयकुमार आणि सारा अलीबरोबर ‘अतरंगी रे’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER