रजनीकांतची राजकारणातून माघार, पक्ष न स्थापण्याचा घेतला निर्णय

rajnikant
rajnikant

रजनीकांत (Rajinikanth) म्हणजे केवळ देशातीलच नव्हे तर परदेशातील प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणारे एक नाव. थलैवा नावाने ओळखल्या जाणाऱ्या या रजनीकांतच्या प्रत्येक गोष्टीकडे त्याच्या फॅन्सचे प्रचंड लक्ष असते. दक्षिणेतील अन्य अभिनेत्यांप्रमाणे रजनीकांतनेही राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला होता. पण आता आजारपणामुले रजनीकांतने राजकारणात न येण्याचा निर्णय घेतला असून यासाठी त्याने एक तीन पानी पत्र लिहून फॅन्सकडे दिलगिरीही व्यक्त केली आहे.

3 डिसेंबरला नाऊ ऑर नेव्हर हा नारा देत रजनीकांतने राजकारणात एंट्री करणार असल्याचे सूतोवाच केले होते. वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे 12 डिसेंबरला तो राजकीय पक्षाची स्थापना करेल असे म्हटले जात होते पण त्या दिवशी पक्षाची स्थापना झाली नाही आणि 31 डिसेंबरला राजकीय पक्षाची स्थापना करण्याचे ठरवण्यात आले होते. पक्षाची स्थापना करण्याची तयारी सुरु करण्यात आली होती. पुढील वर्षी तामिळनाडूत विधानसभेच्या निवडणुका होणार असून त्यात रजनीकांत उतरून सगळीच गणिते उलटीपालटी करेल असे म्हटले जात होते. पण काही दिवसांपूर्वी रजनीकांत आजारी पडला आणि सगळेच चित्र बदलून गेले.

रजनीकांत त्याच्या नव्या ‘अन्नाथे’ सिनेमाचे शूटिंग करीत असताना त्याच्या यूनिटमधील काही जणांना कोरोनाची लागण झाली. त्यानतंर रजनीकांत यांची तपासणी केली असता त्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला पण रक्तदाबाचा त्रास होत असल्याचे समोर आले. दोन दिवसानंतर हॉस्पिटलमधून रजनीकांतला डिस्चार्ज देण्यात आला आणि एक आठवडा पूर्ण विश्रांती करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यामुळे रजनीकांतच्या नव्या पक्षाचे लाँचिंग पुढे ढकलेल जाणार असे सांगितले जात होते. पण त्यापूर्वीच रजनीकांतने निर्णय जाहीर करून टाकला.

रजनीकांतने सोशल मीडियावर तामिळ भाषेत एक तीन पानांचे पत्र लिहून राजकारणात न उतरण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. या निर्णयामागची भूमिका स्पष्ट करताना रजनीकांत म्हणतो. माझ्या या निर्णयामुळे माझे अनेक चाहते निराश होतील हे मला माहीत आहे. पण हा निर्णय घेताना मला किती वेदना होत आहेत हे फक्त मीच समजू शकतो. माझे आजारपण हे देवाने मला याबाबतीत दिलेली एक वॉर्निंग आहे असे मी मानतो. पक्ष स्थापन केल्यानंतर केवळ मीडिया आणि सोशल मीडियातून मी प्रचार करीत राहिलो तर त्यामुळे राजकीय प्रगती होणार नाही. राजकीय अनुभव असलेली कोणतीही व्यक्ती हे वास्तव नाकारु शकणार नाही असेही रजनीकांतने पत्रात म्हटले आहे.

रजनीकांतने राजकारणात येण्यापासून माघार घेतल्याने तामिळनाडूतील सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने सुटकेचा निश्वास सोडला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER