राजेश खन्नांनी ‘ड्रीम गर्ल’ला भेट दिलेल्या ‘इम्पाला कार’नं संपूर्ण देशाला वेड लावलं होतं!

Rajesh Khana - Maharastra Today

साठच्या दशकात जगभरातल्या रस्त्यांवर एक क्लासिक वेगवान कार चालायची. लोकांच्या नजरा तिच्यावरून हटायच्या नाहीत. तिचं दमदार इंजिन त्याच्या येण्याची बातमी प्रत्येकाला द्यायची. ही कोणती सामान्य कार नव्हती. तर ‘क्लासिक इम्पाला’ कार होती. एकेकाळी रस्त्यांवर राज्य करणारी इम्पाला आज काळाच्या पडद्याआड गेली तरी तिचा चाहता वर्ग मात्र अजूनही तिच्यावर तितकंच प्रेम करतो.

फोर्डला टक्कर देण्यासाठी

वर्ष होतं १९५८. कार कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा निर्माण झाली होती. दोन महायुद्धे  पचवल्यानंतर जागतिक बाजारपेठा वेगानं मंदीच्या सावटातून बाहेर पडल्या. त्याच वेगाच्या कार घेऊन त्या बाजारात उतरल्या. अनेक कंपन्या एकमेकांना टक्कर देत होत्या. तुलनेत फोर्ड यांनी बाजी मारली होती. फोर्डच्या गाड्या जनतेच्या पसंतीस उतरल्या होत्या.

तर दुसऱ्या बाजूला ‘शेवरले’ला मागं टाकण्यात फोर्डला यश आलं होतं. शेवरले कंपनी काही असं करण्याच्या विचारात होती ज्यामुळं बाजारातलं अव्वल स्थान मिळवता आणि राखता येईल. याच विचारात असताना त्यांनी नवी कार बाजारात आणण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर ‘शेवरले’च्या सर्व ऑटोमोबाईल इंजिनीअर्सना एकत्र आणण्यात आलं. त्यांची बैठक झाली आणि नवं डिझाईन बनवण्याचे प्रयत्न सुरू झाले.

थोडक्या कालावधीतच नवी कार बनवली गेली. सर्व लोक चकित होते. दोन दरवाजांची ही कनव्हर्टेबल कार होती. मार्केटमधल्या इतर कारच्या तुलनेत ही कार हटके होती. कारचा असा क्लासिक लूक आधी कुणीच पाहिला नव्हता. डिझाईनमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स  मिळवणारी कार चालवायला कशी आहे याचा निर्णय अजून व्हायचा होता. पेट्रोल इंजिनसह १३६ हॉर्स पॉवरची इम्पाला दमदार कार होती. वेगवान ड्रायव्हिंगसाठीच कार बनवण्यात आली होती. प्रतितास १५० किलोमीटर वेगानं धावण्याची क्षमता या कारमध्ये होती. फक्त १४ सेकंदात ० ते ६० किलोमीटर वेग पकडणं या कारला सहज शक्य होतं. अशी तगडी गाडी बनून तयार होती. गाडीचं नाव काय ठेवावं या विचारात कंपनी होती.

बऱ्याच विचारविनिमयानंतर गाडीचं नाव ठेवण्यात आलं ‘इम्पाला.’ आफ्रिकेत आढणाऱ्या विशेष प्रकारच्या वेगवान हरीण प्रजाती या नावानं ओळखली जाते. डिझाईन आणि गाडीचा वेग ध्यानात ठेवून ही कार बनवण्यात आली होती. दिसायलादेखील ही कार जबरदस्त होती. शेवरलेनं १९५८मध्ये ही कार बाजारात आणली. किंमत ठेवली होती २५०० डॉलर्स. या कारनं नंतरच्या काळात ऑटोमोबाईल जगताचा चेहरामोहरा बदलला.

राजेश खन्नांची लाडकी कार

राजेश खन्ना यांची ओळख बॉलिवूडचा पहिला सुपर स्टार अशी आहे. त्यांनी लोकप्रियतेचा जो कळस गाठला, अनेकांच्या नशिबात ते आलं नाही. देशभरात राजेश खन्नांची क्रेझ होती आणि राजेश खन्नांच्या मनात क्रेझ होती इम्पाला गाडीची. १९७१ साली प्रदर्शित झालेल्या राजेश खन्ना यांना  ‘हाथी मेरे साथी’ या चित्रपटात लाल रंगाची  इम्पाला गाडी आणि गाणं गाताना चित्रित करण्यात आलं.

साठच्या दशकात जेव्हा राजेश खन्ना संघर्ष करत होते तेव्हा ही कार आपल्याकडं असावी, असं त्यांचं स्वप्न होतं. मेहनतीच्या जोरावर त्यांनी प्रचंड पैसा आणि लोकप्रियता कमावली आणि इम्पाला गाडी बंगल्यासमोर उभी केली. इतकंच नाही तर राजेश खन्ना जेव्हा डिंपल कपाडीयाच्या प्रेमात होते तेव्हा त्यांनी डिंपल कपाडीयाला इम्पाला कार भेट दिली होती.

राजेश खन्ना यांच्यामुळं भारतात इम्पालाला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. भारतातल्या रस्त्यांवर यानंतर बऱ्याच इम्पाला दिसू लागल्या होत्या. या गाडीनं जगभरात प्रचंड लोकप्रियता कमावली.

विक्रीचे सर्व विक्रम काढले मोडीत

१९५८ साली इम्पाला बाजारात आली आणि साठचं दशक या कारनं गाजवलं. १९६५ पर्यंत गाडीच्या डिझाईनमध्ये काहीच बदल करण्यात आले नाहीत. १९६६ साली जेव्हा गाडीचं डिझाईन बदललं आणि कारचं नशीबदेखील. दोन दरवाजांऐवजी चार दरवाजे या कारला बसवण्यात आले. इंजिनमध्ये बदल करण्यात आले. व्ही-८ इंजिन लावण्यात आलं. यामुळं गाडीचा परफॉर्मन्स अजून वाढला. यानंतर जगभरात इम्पालाची मागणी परत वाढली. दरवर्षी दहा लाख इम्पाला विकल्या जात होत्या.

इंधनाच्या संकटानं गाडीची विक्री वाढवली

बाजारात आल्याच्या पहिल्या दिवसापासून इम्पाला कार यशशिखरावर होती. १९७१मध्ये कारचं नवं मॉडल बाजारात आलं. गाडीचा वेग प्रचंड वाढला. इंजिनाची ताकद ३६५ हॉर्स पॉवर करण्यात आली. या मॉडेलमुळं इंजिनसुद्धा अधिक मायलेज देऊ लागलं. १९७३ मध्ये इंधन संकट उभं राहिलं तेव्हा कंपनीला याचा फायदा झाला. संपूर्ण जगात इंधन तुटवडा निर्माण झाला आणि मायलेज जास्त देणाऱ्या इम्पाला या काळात पुन्हा जास्त विकल्या गेल्या.

बदलत्या काळासोबत बाजारात नव्या कार आल्या. नव्या अत्याधुनिक सोईसुविधांसह आलेल्या कारमुळं इम्पालाची विक्री घटत गेली. नंतर नुकसान होऊ नये म्हणून कंपनीनं उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला. १९८५ साली इम्पाला बाजारात दिसेनाशी झाली. १९९५ साली नव्या दमात नव्या ढंगात इम्पाला परत बाजारात आली; पण गतवैभव तिला प्राप्त करता आलं नाही. आजही नव्या रूपातली इम्पाला अमेरिकेच्या रस्त्यांवर धावताना दिसते. अनेक जण या नव्या इम्पालात जुन्या इम्पालाला शोधण्याचा अपयशी प्रयत्न करत असतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button