
बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांची आज जयंती आहे. जर आज ते जिवंत असते तर त्यांनी ७८ वा वाढदिवस साजरा केला असता. प्रेमाने ‘काका’ म्हणून ओळखले जाणारे राजेश खन्ना वेगळेच होते आणि मैत्रीच्या बाबतीतही ते दिलखुलास होते. १९७३ मध्ये जेव्हा त्यांनी डिम्पल कपाडियाशी लग्न केले आणि हनिमूनला गेले तेव्हा ते तेथे फक्त आपल्या पत्नीसमवेत गेले नव्हते.
डिम्पलव्यतिरिक्त त्यांनी चित्रपट निर्माते राज बतीजा, त्यांची पत्नी निर्मल आणि बलदेव पाठक यांना सोबत घेतले होते. इतकेच नव्हे तर लंडनमध्ये हनिमूनदरम्यान डिम्पलचा वाढदिवसही आला. अशा परिस्थितीत राजेश खन्ना यांनी लंडनमध्येच एक मोठी पार्टी आयोजित केली होती. या पार्टीमध्ये त्यांनी अमिताभ आणि जया बच्चन यांनाही आमंत्रित केले होते. वास्तविक, अमिताभ बच्चन आणि जया यांचेही त्याच वर्षी लग्न झाले होते आणि तेही हनिमूनसाठी लंडनला होते. राजेश खन्ना आणि डिम्पलच्या लग्नाची कहाणीही खूप रंजक आहे.
राजेश खन्ना यांची डिम्पलशी जेव्हा भेट झाली तेव्हा ऋषी कपूरसोबत डिम्पलचा ब्रेकअप झाला होता. डिम्पल कपाडिया त्यावेळी राजेश खन्ना यांची मोठी फॅन होती, त्यांच्या स्टाईलची फॅन होती. दोघांनाही जवळ येण्यास जास्त वेळ लागला नाही आणि मग त्यांचे लग्न झाले. डिम्पल राजेश खन्नांपेक्षा १५ वर्षांनी लहान आहे. डिम्पलचे वडील चुनीभाई कपडिया यांच्या जुहू येथील बंगल्यात मार्च १९७३ मध्ये दोघांचे लग्न झाले होते. राजेश खन्ना आणि डिम्पल कपाडिया यांच्या आयुष्यात बरेच चढउतार आले.
पत्नीपासून विभक्त राहात असलेल्या राजेश खन्ना यांनीसुद्धा एकदा म्हटले होते, “तुम्हाला माहिती आहे का, मी अजूनही माझी पत्नी डिंपलवर खूप प्रेम करतो.” राजेश खन्ना आणि डिम्पल बरीच वर्षे विभक्त राहिले; परंतु त्यांचा घटस्फोट झाला नव्हता. ट्विंकल खन्ना राजेश खन्ना यांची मुलगी आहे आणि अक्षयकुमार त्यांचा जावई आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला