फडणवीसांवरील आरोपांची हवा राजेंद्र शिंगणे यांनी काढली नवाब मलिक तोंडावर पडले

Maharashtra Today

मुंबई :- राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingane) यांनी मंगळवारी दिलेल्या एका मुलाखतीने विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर रेमडेसिविर इंजेक्शनवरून बेछुट आरोप करणाऱ्यांचा पुरता बुरखा फाटला आहे. देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांना रेमेडीसिवीर विनापरवानगी राज्यात आणून कंपनीच्या भल्यासाठी ते सगळे काही करत होते अशा पद्धतीने आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला होता. नवाब मलिक हे राज्याचे मंत्रीदेखील आहेत. मात्र त्यांच्याच मंत्रिमंडळातील सहकारी असलेले अन्न व औषधी प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी फडणवीस यांच्या कृतीचे एक प्रकारे समर्थन तर केलेच शिवाय फडणवीस यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत एका आघाडीच्या टीव्ही चॅनेलने विचारले असता त्यात राजकारण केले गेले असे विधान शिंगणे यांनी केले. त्यामुळे नवाब मलिक आणि राष्ट्रवादी तसेच काँग्रेसच्या टीकाखोर नेत्यांना घरचा अहेर मिळाला आहे.

डॉ.राजेंद्र शिंगणे केवळ एवढे बोलूनच थांबले नाहीत तर दमणमधील कंपनीतून 50 हजार रेमेडीसिवीर आणून ते सरकारला मोफत देण्यात येतील अशी जी भूमिका भाजपने जाहीर केली होती त्या भूमिकेवर शिंगणे यांनी शिक्कामोर्तब केले.

या मुलाखतीत शिंगणे यांनी स्पष्ट केले की विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर गेल्या आठवड्यात मला येऊन भेटले होते. राज्यात रेमेडीसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. ते दमणमधील कंपनीतून रेमेडीसिवीर आणून राज्यातील जनतेला देणार होते. अर्थातच त्यांना ते थेट जनतेला वाटता येत नाहीत. ते सरकारलाच द्यावे लागतात.त्यानुसार हे इंजेक्शन सरकारला दिले जाणार होते असेही शिंगणे यांनी स्पष्ट केल्याने नवाब मलिक आणि इतरांच्या आरोपातील हवाच निघून गेली आहे.

या निमित्ताने हे स्पष्ट झाले की राज्यात 50 हजार रेमेडीसिवीर आणून ते जनतेला परस्पर मोफत देऊन त्याचा राजकीय फायदा उचलण्याची भाजपची कुठलीही खेळी नव्हती. हे इंजेक्शन राज्य सरकारलाच भेट दिले जाणार होते असे शिंगणे यांनी सांगितल्याने आता नवाब मलिक तोंडावर पडले आहेत.


 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button