राजेंद्र माने अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांकडून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी कार्टची निर्मिती

रत्नागिरी(प्रतिनिधी ):  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विलगीकरण केंद्रात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कार्टची निर्मिती केली आहे. या तंत्राद्वारे रुग्णांना अन्न व औषध देणे सोपे होणार आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांचा रुग्णांशी थेट संपर्क येणार नाही.

संगमेश्वर तालुक्यातील साडवली येथील स्व. मीनाताई ठाकरे हायस्कूल व अन्य ठिकाणी विलगीकरण केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. विलगीकरण केंद्रामध्ये काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी रुग्णाची देखरेख करताना स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे. मात्र रुग्णाशी येणारा थेट संपर्क त्यांच्या आरोग्यावर परिणाम करणारा आहे. याच अनुषंगाने आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी ब्लूटूथद्वारा नियंत्रित कार्टची निर्मिती केली आहे. ही एक बॅटरीवर चालणारी कार्ट असून, त्याद्वारे १० मीटरपर्यंत आणि जवळपास ९० किलो पर्यंतच्या वजनाची सामुग्रीची ने-आण करणे शक्य होते.

रिमोट कंट्रोलने चालणाऱ्या या कार्टचा रुग्णांना अन्न व औषधी देण्याचे काम करताना प्रत्यक्ष वापर करता येऊ शकेल व त्यायोगे आरोग्य कर्मचाऱ्यांचा रुग्णांशी थेट संपर्क टाळता येणे शक्य आहे. महाविद्यालयाच्या प्रा. इसाक शिकलगार आणि इलेक्ट्रॉनिक्स शाखेतील अंतिम वर्षाचा विद्यार्थी प्रतीक महाडिक यांनी ही कार्ट तयार केली आहे. संस्थेच्या कार्यकारी अध्यक्ष नेहा माने यांच्या हस्ते संगमेश्वर तहसीलदार सुहास थोरात यांच्याकडे हे यंत्र देण्यात आले. यावेळी विस्तार अधिकारी आर. एम. दारोकार, पोलीस निरीक्षक निशा जाधव, प्रद्युम्न माने, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत, पद्मनाभ शेलार उपस्थित होते.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER