राज्यपालांच्या हस्ते राजेंद्र दर्डा यांच्या ‘माझी भिंत’ पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

माजी मंत्री राजेंद्र दर्डा (Rajendra Darda) यांच्या फेसबूक पेजवरील नोंदी, निरीक्षणे, स्फुट लेख व अभिप्राय यांचे संकलन असलेल्या ‘माझी भिंत’ या पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी (दि. ९) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्या हस्ते राजभवन येथे संपन्न झाले.

कार्यक्रमाला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan), जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil), लोकमत समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा, लेखक राजेंद्र दर्डा व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

सुंदर मराठी भाषेतून लिहिलेल्या आपल्या पुस्तकामध्ये राजेंद्र दर्डा यांनी अधून मधून हिन्दी भाषेतील पक्तींची चवदार फोडणी दिल्यामुळे ‘माझी भिंत’ पुस्तक अतिशय वाचनीय झाले आहे, असे मत राज्यपालांनी यावेळी व्यक्त केले.

महाराष्ट्रात आठ शतकांपूर्वी संत ज्ञानेश्वर महाराजांनी योग सामर्थ्याने भिंत चालवल्याचा उल्लेख आहे. समाज माध्यमांच्या आजच्या युगात राजेंद्र दर्डा यांनी देखील आपली ‘आभासी भिंत’ यापुढेही चालू ठेवावी, अशी सूचना राज्यपालांनी केली.

राजेंद्र दर्डा आणि आपण पद्मसिंह पाटील यांच्याकडे राज्यमंत्री म्हणून एकत्र काम केले आहे, याची आठवण बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केली. समाज माध्यम हे दुधारी शस्त्र असून त्याचा चांगला वापर कसा होऊ शकतो याचे ‘माझी भिंत’ हे उदाहरण आहे असे त्यांनी संगितले.

करोना काळात लोकांमध्ये एक अदृश्य भिंत तयार झाली आहे. राजेंद्र दर्डा यांची ‘माझी भिंत’ ही अदृश्य भिंत तोडण्याचे व माणसे जोडण्याचे काम करीत आहे असे निरीक्षण अशोक चव्हाण यांनी नोंदविले.

राजेंद्र दर्डा अतिशय हुशार व प्रश्नांची जाण असणारे सहकारी मंत्री होते याचे स्मरण देऊन ‘माझी भिंत’ हे पुस्तक जग न फिरलेल्‍यांना जगभ्रमंतीचा आनंद देणारे पुस्तक आहे, असे जयंत पाटील यांनी संगितले.

लोकमत समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा यांनी प्रास्ताविक केले तर राजेंद्र दर्डा यांनी पुस्तकासंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केली.

राज्यपालांच्या हस्ते या वेळी लोकमतच्या ‘द‍िपोत्स’व व ‘दीपभव’ या दिवाळी विशेषांकांचे प्रकाशन करण्यात आले.

देवेंद्र दर्डा यांनी आभार प्रदर्शन केले तर लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी यांनी सूत्रसंचलन केले.

Governor Bhagat Singh Koshyari - Majhi Bhint

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER