शिवसेनेच्या मंत्र्यांनी केवळ राजीनाम्याची धमकीच दिली, राज ठाकरेंचा सेनेला टोला

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दहिसरमध्ये प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी शिवसेनेचा चांगलाच समाचार घेतला

शिवसेना आपल्या जाहिरातीत “हीच ती वेळ” म्हणत आहेत, मग मागील ५ वर्ष हे काय करत बसले होते? मागील ५ वर्ष हे फक्त हा घ्या आमचा राजीनामा म्हणत केवळ धमकीच देत होते. यातच त्यांचे ५ वर्ष निघून गेले, असा टोला राज ठाकरेंनी शिवसेनेवर लगावला. “सरकारने एका रात्रीतून आरेतील २७०० झाडांची कत्तल केली. मात्र, त्यानंतर आलेल्या शिवसेनेच्या जाहीरनाम्यात आरेवर एक शब्दही नाही. उद्धव ठाकरे आता निवडणुकीत निवडून आलो, तर आरेला जंगल घोषित करण्याचं आश्वासन देतात. पण निवडून आल्यावर ते गवत लावून जंगल घोषित करणार आहे का?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

राज ठाकरेंनी आपल्या भाषणात आंदोलन अर्धवट सोडण्याच्या आरोपावरही सडेतोड उत्तर दिलं. ते म्हणाले, “माझ्यावर आंदोलनं अर्धवट सोडण्याचा आरोप विरोधक करतात. मात्र, मी एकही काम अर्धवट सोडत नाही. टोल आंदोलनानंतर ७८ टोलनाके बंद झाले. मनसेने टोलनाके बंदचं, मराठी सणांना परवानगीचं, मराठी चित्रपटांना थिएटर मिळवण्याचं आंदोलन केलं आणि त्यात यशही मिळवलं.” महाराष्ट्रात अन्याय होतो, प्रश्न तयार होतो, तेव्हा जनता विश्वासाने मनसेकडं येते, असंही यावेळी राज ठाकरेंनी यावेळी नमूद केलं.