नाणार प्रकल्प होऊ देणार नाही, असे म्हणणारे राज ठाकरेंचा युटर्न!

मुंबई : कोकणातील नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाला विरोध करणारे मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका आता बदलली आहे. कोरोनामुळे मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला वाढवण्यासाठी आणि बेरोजगारी कमी करण्यासाठी या प्रकल्पातून फायदा होऊ शकेल, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. २०१८ मध्ये राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नाणारमध्ये तेल शुद्धीकरण प्रकल्प होऊ देणार नाही, असा इशारा दिला होता. यामुळे आता राज ठाकरे यांच्या बदललेल्या भूमिकेविषयी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

पत्रात काय म्हणाले ठाकरे?
त्यावेळी या प्रकल्पाविरूद्ध स्थानिक मच्छिमारांच्या भावनांचा विचार करता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह सर्व राजकीय पक्ष त्यांच्या पाठीशी उभे होते. आजची परिस्थिती वेगळी आहे. आज एकही नवा उद्योग अथवा एकही परदेशी गुंतवणूक महाराष्ट्राबाहेर जाणे आपल्याला परवडण्यासारखे नाही. अन्यथा औद्योगिकीकरणात अग्रेसर महाराष्ट्र ही राज्याची ओळख पुसायला वेळ लागणार नाही. कोरोनानंतर परिस्थिती बदलली आहे. लाखो तरुण बेरोजगार झालेत. शासन आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. अशाप्रसंगी राज्य ठाम राहण्यासाठी उद्योगांकडे आणि प्रकल्पांकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पहावे लागतील. या नवीन प्रकल्पामुळे जो रोजगार निर्माण होईल, त्यात कोकणी आणि पर्यायाने महाराष्ट्रातील मराठी माणसांना प्राधान्य असायला हवे, असे राज ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.

या प्रकल्पामुळे रोजगारनिर्मिती
आशिया खंडातील सर्वांत मोठी तेल शुद्धीकरण प्रकल्प आहे. हा प्रकल्प प्रामुख्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या सीमेवरील नाणार येथे उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या प्रमुख तेल कंपन्या एकत्र येईल. नाणार प्रकल्पात ३ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होईल, असा अंदाज आहे. कोरोनामुळे मंदावलेल्या राज्याच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी ही गुंतवणूक महत्त्वाची ठरू शकते.

नाणारला स्थानिकांचा विरोध का?
नाणार प्रकल्प हा जगातील मोठया तेलुशद्धीकरण प्रकल्पांपैकी एक असणार आहे. यासाठी १५ हजार एकर जमीन अधिग्रहीत करावी लागेल. यात नाणारमधील ८ हजार शेतकऱ्यांना जमिनी गमवाव्या लागतील. अनेक कुटुंबे विस्थापित होतील. या जमिनींवर आंब्याच्या, नारळी-पोफळीच्या बागा आहेत. त्यामुळे स्थानिकांचा रोजगार नष्ट होईल. या तेलशुद्धीकरण प्रकल्पामुळे समुद्राचे प्रूदषण होण्याचाही धोका आहे. यामध्ये हजारो मच्छिमाऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न भीतीदायक आहे. कोरोना संकटानंतर बेरोजगारीचे प्रमाण वाढल्याने स्थानिकांच्या भूमिकेत बदल झाल्याचा दावासुद्धा काही लोकांनी व्यक्त केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER