राज ठाकरेंचे प्रत्येक प्रकरणात सेटलमेंट, मनसे संपला- अबू आझमी

मुंबई : सपचे आमदार आणि प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर जोरदार टीका केली; शिवाय त्यांनी भाजपवरही निशाणा साधलाय. राज ठाकरेंचा पक्ष संपला असून ते प्रत्येक प्रकरणात सेटलमेंट करतात, असा आरोप अबू आझमींनी केला.

राज ठाकरेंमुळे परप्रांतीयांना मारहाण झाली होती हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी विसरले आहेत. राज ठाकरेंना सोबत घेतल्यामुळे काँग्रेस आणि महागठबंधनला राज्याच्या बाहेर नुकसान होईल, असा दावाही त्यांनी केला. राज ठाकरे हे मिमिक्री आर्टिस्ट आहेत. मेहमूद आणि असरानी यांच्यासारख्या कलाकारांना लोक ऐकायचे तसं राज ठाकरेंना लोक ऐकतात.

ही बातमी पण वाचा  : मोदी-शहांनी आजपर्यंत दादागिरीच केली, मग ममतांनी केली तर बिघडलं काय? – राज ठाकरे

अबू आझमी यांनी भाजपवरही निशाणा साधला . देशात १०० टक्के भाजपच्या विरोधात वातावरण असल्याचं ते म्हणाले. भाजपच्या पापांचा घडा भरलेला आहे. निवडणूक आयोगानेही भाजपत प्रवेश केला आणि कार्यकर्त्यांसारखं काम केलं जातं. उत्तर प्रदेशात भाजपला ५० टक्के नुकसान होईल, असा त्यांनी अंदाज केला; शिवाय देशातील मुसलमानांना विनाकारण जेलमध्ये टाकलं जातं आणि पुरावेही मागितले जात नाहीत; पण साध्वी प्रज्ञासिंहच्या अटकेनंतर पुरावे मागितले जातात, असं म्हणत अबू आझमींनी साध्वीच्या वक्तव्यावरही जोरदार टीका केली.