‘राज ठाकरेंची मनसे जोमात’, ‘कृष्णकुंज’वर होणारी गर्दी ही नव्या राजकीय बदलांची नांदी?

Raj Thackeray

मुंबई :- गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी मागण्या घेऊन येणाऱ्या शिष्टमंडळांचा ओघ वाढत चालला आहे. मूर्तिकार, मुंबईचे (Mumbai) डबेवाले, जिम मालक-चालकांपासून, कोळी महिला, मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी ओघ वाढल्याने मनसेतही नव उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे.

ग्रंथालय आणि अभ्यासिका सुरू करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी विश्वस्त, संचालकांनी कृष्णकुंजवर राज ठाकरे यांची भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या. त्यानंतर राज यांनी उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्याशी मोबाइलद्वारे चर्चा केली असता लवकरच याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन सामंत यांनी दिले. अलीकडेच डोंगरी भागातील कोळी महिलांनी अनधिकृत मासे विक्रेत्यांवर कारवाईच्या मागणीसाठी कृष्णकुंजवर राज ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर पालिकेनेही डोंगरी भागात तातडीने कारवाईचा बडगा उगारला होता. यानंतर त्यांचे आभार मानण्यासाठी गुरुवारी परत एकदा कोळी महिला कृष्णकुंजवर आल्या होत्या. तर, मुंबईतील डबेवाल्यांनी लोकल प्रवासाच्या मागणीसाठी कृष्णकुंजवर धाव घेतली होती. त्यानंतर राज्य सरकारकडून डबेवाल्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली.

अलीकडच्या काळात शिष्टमंडळांनी कृष्णकुंज गाठावे आणि राज यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवावे, असा शिरस्ता सुरू झाला आहे. मात्र भाजप हा राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असताना राज ठाकरे यांच्या ‘कृष्णकुंज’वर होणारी गर्दी अनेकांना आश्चर्यचकित करणारी आहे. विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस (Devendra Fadnavis), प्रवीण दरेकर (Pravin Darekar), आशिष शेलार (Ashish Shelar) आदी भाजपे (BJP) नेते सरकारविरोधात रान उठवत असताना राज ठाकरे यांच्याकडे जनतेचा वाढलेला ओघ ही नव्या राजकीय बदलांची नांदी तर नाही ना, अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे.

ही बातमी पण वाचा : कृष्णकुंज बनतेय न्यायाचे मंदिर!’; ग्रंथालये लवकरच सुरू होणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER