राज ठाकरेंचे पंतप्रधान मोदींना पत्र; महाराष्ट्रासाठी केली ‘ही’ मोठी मागणी

Raj Thackeray - PM Modi - Maharastra Today

मुंबई :- राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) पत्र लिहिले आहे. पत्रामधून राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मोदींसमोर काही प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये त्यांनी राज्याला स्वतंत्रपणे लस खरेदी करू देण्याची मागणी केली आहे. तसंच महाराष्ट्रात १०० टक्के लसीकरण करावं, खासगी संस्थांनाही लस खरेदीची परवानगी दिली जावी, अशी मागणीही त्यांनी मोदींकडे केली आहे.

राज ठाकरेंनी मोदींना लिहिलेले पत्र :

राज ठाकरे यांनी मोदींना लिहिलेल्या पत्रात कोरोनाची दुसरी लाट भयंकर असून त्यातून बाहेर पडण्यासाठी लॉकडाऊन आणि निर्बंध लावणं हा उपाय नाही, असं मत व्यक्त केलं आहे. तसंच महाराष्ट्राला १०० टक्के लसीकरण करण्याची गरज असल्याचं सांगताना त्यांनी काही मागण्या केल्या आहेत. यामध्ये त्यांनी महाराष्ट्र राज्याला स्वतंत्रपणे लस खरेदी करू द्यावं, अशी पहिली मागणी केली आहे. तसंच राज्यातील खासगी संस्थांना लस खरेदी करता यावी अशी मागणी त्यांनी पत्रात केली आहे. यासोबत सीरमला महाराष्ट्रात मुक्तपणे पण योग्य नियम पाळून लसविक्रीची परवानगी द्यावी, लसींचा पुरवठा वेळेत व्हावा यासाठी इतर खासगी संस्थांना (उदा. हाफकिन व हिंदुस्थान अँटिबायोटिक) लस उत्पादन करण्याची मुभा दिली जावी तसंच कोरोनावरील उपचार करण्यासाठी लागणारी आवश्यक औषधं उदा. रेमडेसिवीर, ऑक्सिजन याचा पुरेसा पुरवठा राज्यात असावा म्हणून राज्याला आवश्यक पावले उचलण्यासाठी मोकळीक द्यावी. अशी मागणीही राज ठाकरे यांनी पत्रात केली आहे.

कोविडची साथ सुरू झाल्यापासून महाराष्ट्राला सर्वाधिक फटका बसला आहे. देशातल्या पहिल्या काही रुग्णांपैकी काही महाराष्ट्रात आढळले. तेव्हापासून निव्वळ आकड्यांमध्ये मोजल्यास, सर्वाधिक रुग्ण आणि दुर्दैवाने सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रातदेखील झाले आहेत. आज संपूर्ण देश कोविडच्या साथीला तोंड देत असताना महाराष्ट्रातली स्थिती सर्वांत बिकट झाली आहे, असे राज ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button