‘जर आज बाळासाहेब किंवा मी असतो तर, शिवसेनेवर ही वेळ आली नसती’, राज ठाकरेंचा उद्धवला टोला

Raj Thackeray

पुणे : राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा जागावाटपावरुन शिवसेनेवर शरसंधान साधले आहे. पावसामुळे बुधवारी पुण्यात मनसेच्या पहिली सभा रद्द झाली होती, त्यामुळे आज पुण्यातील कसबा पेठेत त्यांची सभा पार पडली. शिवसेनेच्या वाट्याला पुण्यात एकही जागा मिळालेली नाही, यावरुन राज ठाकरेंनी शिवसेनेवर बोचरी टीका केली.

पुण्यात भाजपने शिवसेनेच अस्तित्व ठेवलं नाही. नाशिक, पुण्यासारख्या मोठ्या शहरात शिवसेनेला युतीत एक जागा मिळत नाही? कुठून येते ही हतबलता, असा सवाल करत जर, आज माननीय बाळासाहेब ठाकरे असते तर भाजपची असं वागायची हिम्मत झाली नसती. मी जरी असतो तरीही यांची अशी वागण्याची हिम्मत झाली नसती”, असा टोलाही त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत युतीमध्ये शिवसेनेसाठी नवी मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर या महत्वाच्या शहरांमध्ये एकही जागा सोडलेली नाही.

भाजपचे कोथरुडचे उमेदवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरही राज ठाकरेंनी टीका केली. महाराष्ट्रातील सागंली, सातारा, कोल्हापुरात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी सत्ताधारी निवडणुकांच्या प्रचारात तल्लीन झाले होते. त्यादरम्यान कोल्हापूरचे एक मंत्रीच पुण्यात वाहत आले, असा टोला राज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना उद्देशून लगावला.

सरकारने देशभरात स्मार्टसिटी तयार करण्याची घोषणा केली होती. त्या योजनेचं काय झालं? पुणे शहरात भरलेलं पाणी, वाहतूक कोंडी आणि खड्डे पडलेले रस्ते म्हणजे स्मार्ट सिटी? असा सवाल राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना विचारला. बहुमताचं सरकार कुणालाही न जुमानता निर्णय घेत असतं. हे का होतं? कारण त्यांच्यासमोर तगडा विरोधी पक्ष नसतो, असं राज ठाकरेंनी म्हटलं.