राज ठाकरेंचा दावा; ‘राज्यात कडकडीत लॉकडाऊन झाला तर…’

Raj Thackeray - Maharastra Today

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या कोरोनाच्या उद्रेकावर आणि राजकीय राजकारणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांचा खुलासा केला. राज्यात जर कडक लॉकडाऊन झाला तर सर्वसामान्यांना खूप नुकसान होईल आणि याचे गंभीर परिणाम होतील. लॉकडाऊन नको असेल तर नागरिकांनी नियमांचे पालन केले पाहिजे, असे राज ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले.

दरम्यान, यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविषयीही भाष्य केले. राज्यात एकीकडे कोरोना वाढत असून दुसरीकडे आरोग्य व्यवस्था कमी पडत आहे. रुग्णालयात रुग्णांना बेड असून मिळत नाही, असा आरोप राज ठाकरे यांच्याकडून करण्यात आला. महाराष्ट्रात कोरोना का वाढला याची दोन कारणे राज ठाकरे यांनी आज सांगितली. राज ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेही कारणे मांडली.

त्यावर उपाय करण्याच्या सूचनाही केल्या आहेत. काल मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन केला. लॉकडाऊनबाबत बोलण्यासाठी त्यांच्याकडे भेटीची वेळ मागितली होती. परंतु त्यांच्या आजूबाजूला कोविडचे रुग्ण असल्याने ते क्वॉरंटाईन आहेत. त्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही. म्हणून झूम अ‍ॅपवरून आमचे बोलणे झाले. यात कोविड आणि लॉकडाऊनबाबत चर्चा झाली, असे राज ठाकरे म्हणाले.

कोरोनाबाबत राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना केलेल्या सूचना :

 • जे छोटे उद्योग आहेत, त्यांना उत्पादन करायला सांगितले; मात्र विक्रीला बंदी, असे असेल तर उत्पादन करून ठेवायचे कुठे, विकायचे नाही तर उत्पादन का करायचे? म्हणून मी सांगितले दोन-तीन  दिवस विक्रीसाठी सुरू ठेवा. छोट्या व्यापाऱ्यांना आठवड्यातून दोन-तीन दिवस दुकाने सुरू करण्यास परवानगी द्या.
 • अनेकांनी छोटी-मोठी कर्जे घेतली आहेत. बँकांकडे पैसा गेला पाहिजे मान्य, पण लोकांकडे पैसा असेल तर बँकात जाईल. सक्तीने वसूल केले जात आहे. ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे, मग लोकांनी हप्ते कसे भरावे?
 • सरसकट लॉकडाऊन काळात वीज बिल माफ करणे
 • जीएसटीबाबत व्यापाऱ्यांना सूट द्या, राज्याने केंद्राशी बोलावे
 • लॉकडाऊनमध्ये सरकारी कंत्राटी कामगारांना घेतले होते. पण नंतर काढून टाकले. मी सूचना केली, त्यांना घ्या, तहान लागली की विहीर खोदणे योग्य नाही.
 • याबाबतच्या सूचना योग्य आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. मंत्रिमंडळाशी बोलण्याचे आश्वासन दिले.
 • जिम, सलून यांनाही दोन-तीन दिवस सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी.
 • स्वीमिंग पूल बंद ठीक  आहे. पण खेळाडूंना सवलत हवी. स्वीमिंग पूल असो वा अन्य खेळ, बॉडी बिल्डरना सराव करण्यासाठी जिम सुरू ठेवावी.
 • सरकारची तिजोरी माहिती आहे. शेतकऱ्यांना हमी भाव द्यावा. शेतकरी जर कोसळला तर अजून मोठे संकट येईल.
 • शाळा बंद आहेत, पण शाळांच्या फी तशाच आहेत. या शाळांना फी घेऊ नका, अर्धी घ्या.
 • दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पास करा. खालच्या विद्यार्थ्यांना प्रमोट केले, तसे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करा.

राज ठाकरे यांनी राज्यातील राजकारणावरही चर्चा केली. जर भाजप सरकार पाडण्याचे काम करत आहेत, तर सत्ताधारी पक्षातील नेत्यांबद्दलही प्रकरणे समोर येत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर राजीनामे देण्याची वेळ आली आहे. प्रत्येक प्रकरणात मूळ मुद्दा बाजूला राहात असून इतर बाबींवर लक्ष केंद्रित केल्याचेही यावेळी राज ठाकरे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button