राज ठाकरेंचा मनसे ‘युवा फॅक्टर’; विधानसभेत युवकांना संधी देण्याची तयारी

Raj Thackeray

मुंबई :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत कुठलाही उमेदवार उभा न करता मोदी आणि भाजपच्या विरोधात महाराष्ट्रभर सभा घेऊन वास्तव परिस्थिती दाखवून लोकांच्या मनात कुतूहल निर्माण केलं. यानंतर आता त्यांनी विधानसभेत ताकदीने ‘मनसे फॅक्‍टर’ची बांधणी करण्याची रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. २०१४ च्या लोकसभा व विधानसभेत मनसेला पराभवाचा दणका बसला होता; मात्र या वेळच्या लोकसभेत प्रचाराचा नवा फंडा वापरत राज यांनी निवडणुकीच्या रणांगणात उसळी घेतली. त्यांची ही नवीन व आक्रमक प्रचारनीती राज्यातील जनतेच्या पसंतीला उतरल्याची राजकीय चर्चा सुरू असताना आता विधानसभेत ‘राज’का‘रण’ करण्यासाठी मनसेची तयारी सुरू झाली आहे. यासाठी राज ठाकरे यांनी दुष्काळी दौऱ्यावर जाण्याचा निर्णय घेतला.

शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत सरकारी उपाययोजनांची पोलखोल करण्याचा निर्धार केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. शिवसेनेने मागील वर्षी राज्यात दुष्काळ दौरा करत स्वत:च्या सरकारवर टीकेची झोड उठवली होती; मात्र लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत युती केल्यानंतर शिवसेनेला सरकारची स्तुती करणारा प्रचार करावा लागला. आता राज ठाकरे यांनीही दुष्काळ आढावा दौरा करून शेतकरी व सामान्य जनतेशी जवळीक करणार असल्याचे संकेत दिले आहेत.

ही बातमी पण वाचा : राज ठाकरेंमुळे माझा विजय पक्का! – सुनील तटकरे

दरम्यान, या दौऱ्यात राज ठाकरे राज्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना नवा आत्मविश्‍वास देण्याचा प्रयत्न करतील. नव्या चेहऱ्यांना पक्ष संघटनेत संधी देण्यासाठीही राज यांची पसंती असेल, असे मानले जाते. दुसरीकडे, लोकसभा निवडणुकीतील राज ठाकरे यांच्या प्रचाराने मनसैनिकांमध्ये नवा उत्साह संचारल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यांच्या प्रचाराची राज्यातील सर्वच वर्गात चर्चा सुरू असल्याने त्यांचे राजकीय नेतृत्वदेखील सामान्य युवकांना आकर्षित करणारे ठरत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. त्यामुळे आगामी विधानसभेत नव्या व युवा चेहऱ्यांना संधी देत मजबूत पक्षबांधणी करण्यासाठी मनसेला नवसंजीवनी देणार असल्याचे बोलले जात आहे.