मार्चमध्ये राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर; रामाच्या दर्शनाने निवडणुकीचे रणशिंग फुंकणार

Ayodhya -Raj Thackeray

मुंबई :- आगामी मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुका आणि पक्षवाढीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) मोठी रणनीती आखली आहे. आज मुंबईत वांद्रे इथल्या एमआयजी क्लबमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या उपस्थितीत महत्त्वाची  बैठक पार पडली. या बैठकीला राज्यातील मनसेचे सर्व बडे नेते उपस्थित होते. दरम्यान, महापालिका निवडणुकीसाठी आणि पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त राज्यातील जनतेपर्यंत पोहचण्याचा मेगा प्लॅन मनसेने केला आहे. पक्षाध्यक्ष राज ठाकरे १ ते ९ मार्च दरम्यान एका दिवसासाठी अयोध्येला जाऊन रामाचे दर्शन घेणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पक्षवाढीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वरिष्ठ मंडळी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात लोकांच्या भेटीगाठी घेतील. त्याचा अहवाल राज ठाकरे यांना देतील. २७ फेब्रुवारीला  कवी कुसुमाग्रज यांची जयंती.  हा दिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.  हा दिवस सण, उत्सव म्हणून धूमधडाक्यात साजरा केला जाईल. त्या दिवशी मराठी स्वाक्षरी मोहीम सुरू  करण्यात येईल. राज ठाकरे मुंबई आणि ठाणेमध्ये सही करण्यासाठी जातील. मराठी शिकवणाऱ्या शिक्षकांचा, संस्थाचालक, मराठी प्रकाशक, संपादक, कवी, लेखक, खेळाडू यांचा सन्मान मनसे करणार आहे. मराठी वृत्तपत्रे आणि मराठी वृत्तवाहिन्या, नाट्य कलावंत आणि सिनेकलावंत यांचा सन्मान करण्यात येणार आहे, असे बाळा नांदगावकर यांनी सांगितले.

९ मार्चच्या पक्षाच्या वर्धापनदिनाला राज ठाकरे संबोधन करतात. यंदा निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे ९ फेब्रुवारी ते १२ एप्रिलपर्यंत सदस्य नोंदणी करणार आहोत. त्यांना महाराष्ट्र सैनिक म्हणून ओळखपत्र देण्यात येईल. गटाध्यक्षांना नवे नाव ‘राजदूत’ देण्यात येणार असून त्यांना बिल्ला देण्यात येईल. राजकारणापलीकडच्या  सुशिक्षित लोकांनी सूचना कळवाव्यात, त्यांच्या कल्पनांचा शहरांच्या विकासासाठी स्वत:हून काम करणाऱ्या लोकांना राज ठाकरेंच्या स्वाक्षरीचं पत्र दिलं जाईल, असं नांदगावकर म्हणाले.

आगामी महापालिका निवडणुका आणि पक्षवाढीसाठी नवनवीन संकल्पना यावर मनसेच्या बैठकीत चर्चा झाली. मनसे नेते बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, गजानन काळे, विविध नेते उपस्थित होते. मनसेची राज्यस्तरीय कोअर कमिटी तयार करून, निवडणुकांची रणनीती आखली जाणार आहे. सर्व महापालिका स्तरावर ही एक कमिटी असेल. या कमिट्यांकडे महापालिका निवडणुकीची जबाबदारी असेल.

ही बातमी पण वाचा : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसे सज्ज, आज राज ठाकरेंकडून श्रीगणेशा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER