जेम्स बॉण्ड म्हटले की शॉन कॉनरीच आठवतात; राज ठाकरेंची श्रद्धांजली

Raj Thackeray - Sean Connery

मुंबई :- गॉडफादर म्हटले की मार्लन ब्रँडो यांचाच चेहरा डोळ्यांसमोर येतो तसे जेम्स बॉण्ड (James Bond) म्हटले की  बॉण्डपटांच्या चाहत्यांना शॉन कॉनरीच (Sean Connery) आठवतात, या शब्दात राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी जेम्स बॉण्ड ही भूमिका अजरामर करणारे ज्येष्ठ अभिनेते शॉन कॉनरी यांना श्रद्धांजली अर्पण केली. राज म्हणालेत, शीतयुद्धाच्या काळात इयान फ्लेमिंग ह्यांच्या पुस्तकातील ‘जेम्स बॉण्ड’ लोकप्रिय होणं हे स्वाभाविक होतं; पण त्या नायकाचे पुस्तकातले अस्तित्व प्रतिमेच्या विश्वात शॉन कॉनरी ह्यांनी अधिक उत्कट केले, ठळक केले.

शॉन कॉनरी यांनी सहा  बॉण्डपट केले; पण त्या बॉण्डपटातील जेम्स बॉण्ड त्यांनी इतका घट्ट रुजवला की त्यामुळे पुढे जेम्स बॉण्ड साकारणाऱ्या प्रत्येक नटाची दमछाक झाली. कधीही सूर्य न मावळण्याची वल्गना करणाऱ्या ब्रिटिश साम्राज्याचा सूर्य दुसऱ्या महायुद्धानंतर मावळतीला लागला आणि अशा वेळेस जागतिक राजकारणात ब्रिटनचे महत्त्व उत्तरोत्तर कमी होत असताना किमान प्रतिमा पातळीवर ब्रिटन ही महासत्ता आहे हा भास कायम ठेवण्यात ‘इयान फ्लेमिंग’ यांच्या प्रतिभेतून उतरलेला आणि ‘शॉन कॉनरी’ ह्यांच्या प्रतिमेतून उभा राहिलेला ‘जेम्स बॉण्ड’ कारणीभूत आहे.

प्रतिभा आणि प्रतिमेच्या संगमाच्या जोरावर एखाद्या देशाची ‘सॉफ्ट पॉवर’ निर्माण होणे आणि ती अनेक दशके टिकणे हे जगातील दुर्मिळ उदाहरण असावे. शॉन कॉनरींना पडद्यावर पाहताना प्रेक्षकाला स्वतःच्यातल्या मर्यादा, उणिवा जाणवत राहतात; पण तरीही मी पण मर्त्य माणूस आहे. सगळे लोभ, मोह हे मला पण सुटले नाहीत, हे दाखवत त्यांनी ‘जेम्स  बॉण्ड’ला वास्तवाच्या जगात घट्ट रोवून उभं  केलं, हे शॉन कॉनरी यांचं यश. म्हणूनच आजही माझे सगळ्यात आवडते बॉण्ड नट हे शॉन कॉनरीच आहेत. शॉन कॉनरी यांच्या स्मृतीस माझी विनम्र श्रद्धांजली.

शॉन कॉनेरी यांनी त्यांच्या अभिनयाच्या प्रवासात अनेक चित्रपटांमध्ये काम केले. पण जेम्स बॉण्ड म्हणून ते प्रेक्षकांच्या मनात कायमचे कोरले गेले. त्यांचा अभिनय कायमच प्रेक्षकांच्या स्मरणात राहील. त्यांच्या सिनेकारकीर्दीत त्यांचा ‘ऑस्कर’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता. त्यांना तीन ‘गोल्डन ग्लोब’ आणि दोन ‘बफ्तास’ पुरस्कारही मिळालेत. मूळचे स्कॉटलंडचे असणारे शॉन कॉनेरी यांनी ‘इंडियाना जोन्स’, ‘द हंट फॉर रेड ऑक्टोबर’ आणि ‘लास्ट क्रूसेड’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER