राज ठाकरे मैदानात : आज राज्यपालांच्या भेटीला, राजकीय चर्चेला उधाण

Raj Thackeray - Governor Bhagat Singh Koshyari

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारीयांच्या (Governor Bhagat Singh Koshyari) भेटीला जाणार आहेत. या भेटीचं कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र जनहिताच्या प्रश्नांसंदर्भात राज ठाकरे राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. आज दुपारी भेटीची वेळ ठरलेली आहे.

लॉकडाऊनमध्ये (Lockdown) शिथिलता देण्यात आल्याने राज्यातील मंदिरे सुरु करण्याच्या मुद्द्यावरुन राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना एक पत्र लिहिले होते. त्या पत्रातून राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाची आठवण करुन दिली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यपालांना सडेतोड उत्तर दिलं होतं. तर शरद पवार यांनी राज्यपालांच्या पत्रावर नाराजी व्यक्त करत थेट पंतप्रधान मोदी यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार केली होती. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेणार असल्याने जोरदार चर्चेला सुरुवात झाली आहे.

लॉकडाऊन आणि अनलॉकदरम्यान समाजातील विविध घटक आपल्या समस्या घेऊन राज ठाकरे यांना भेटले आहेत. त्यात कोळी बांधव, डबेवाले, मंदिरे सुरु करण्यासंदर्भात काही शिष्टमंडळे आणि अन्य घटकांनी राज ठाकरे यांची भेट घेत आपल्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या आहेत. यातील काही प्रश्न राज ठाकरे यांनी सरकारमधील संबंधित मंत्र्यांशी फोनवरुन चर्चा करुन सोडवले होते. तर काही समस्यांसाठी राज यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. मात्र, आता राज ठाकरे हे राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेणार असल्याने राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER