राज ठाकरेंनी कट-पेस्टचं राजकारण सोडावं; विनोद तावडेंचा राज ठाकरेंना सल्ला

मुंबई : या निवडणुकीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंचा पक्ष उतरला नसला तरी त्यांच्या प्रचार सभा तुफान गाजत आहेत. अगदी पद्धतशीरपणे त्यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना टार्गेट केलं आहे. व्हिडीओच्या माध्यमातून मोदींच्या आश्वासनांचा फोलपणा दाखवण्यासाठी राज ठाकरेंचा ‘लाव रे तो व्हिडीओ ’ हा डायलॉग चर्चेचा विषय बनला आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या व्हिडीओ भाषणबाजीला कट-पेस्टचं राजकारण म्हटलं आहे. राज ठाकरेंना आम्ही पॉझिटिव्ह गोष्टी दाखवतो. त्यांनी आमच्यासोबत त्यांचा माणूस पाठवावा, म्हणजे डिजिटल गावची दुसरी बाजू त्यांना दिसेल. तर, राज ठाकरेंनी कट-पेस्टचं राजकारण सोडावं, सलग ठोस भूमिका घ्यावी, असा सल्लाही विनोद तावडेंनी राज ठाकरेंना दिला आहे.

ही बातमी पण वाचा : राज ठाकरेंनी हरिसालमधील उपस्थित केलेले मुद्दे खोटे : विनोद तावडे

राज ठाकरेंनी भाजप, पंतप्रधान मोदी आणि अमित शहांविरुद्ध रणशिंग फुंकले आहे. आपल्या भाषणात मोदींचे जुने व्हिडीओ राज ठाकरेंकडून दाखविण्यात येत आहेत. त्यातील एका व्हिडीओत मोदींचे जवानांबद्दलचे मत दाखविण्यात येत आहे. त्यावर बोलताना तावडे म्हणाले की, ”मोदी काय म्हणाले, व्यापारी हा रिस्क घेतो, तशीच सैन्याची रिस्क असते. सैन्याकडून एकही जवान शहीद न होता, सर्जिकल किंवा एअर स्ट्राईक होणं शक्य आहे का ? सैन्य प्लॅनिंग करून आपलं मिशन पूर्ण करतं. व्यापाऱ्यालाही अशीच रिस्क घ्यायची असते. ” असा अर्थ मोदींच्या त्या भाषणाचा होतो. त्यामुळे केवळ कट-पेस्टचं राजकारण न करता राज ठाकरेंनी ठोस भूमिका घ्यावी, असे तावडेंनी म्हटलं आहे.

ही बातमी पण वाचा : राज ठाकरेंच्या व्हीडिओ पॅटर्नचं राष्ट्रवादीकडून कौतूक; धनंजय मुंडे म्हणतात, ‘हा सूर्य आणि हा जयद्रथ’