मास्क का नाही वापरावा याच ठोस कारण राज ठाकरेंनी दयावे – संजय राऊत

Sanjay Raut - Raj Thackeray

मुंबई :- सध्या मास्क वापरणे हाच कोरोनापासून वाचण्याचा उत्तम पर्याय आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान वारंवार हेच लोकांना पटवून देत आहेत. राज ठाकरेंनी मास्क का वापरायचा नाही, याचं एकदा ठोस कारण सांगावं, असं आवाहन शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना केलं. राज ठाकरे (Raj Thackeray) आज नाशिकच्या दौऱ्यावर असून, त्यांनी मास्क घातलेला नव्हता. तसंच नाशिकचे माजी महापौर मुर्तडक यांनाही राज ठाकरे यांनी चेहऱ्यावरील मास्क काढण्याची सूचना केली. त्यामुळे राज ठाकरेंचा ‘विना मास्क इशारा’ चर्चिला जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज ठाकरेंच्या मास्क न घालण्याच्या वर्तनावर टोलेबाजी केली.

याबाबत बोलताना राऊत म्हणाले की, सर सलामत तो पगडी पचास तसं आधी जीव महत्वाचा आहे. इस्पितळात गेल्यावर जे भोगावे लागते ना…तेव्हा वाटते अरेरे ऐकायला हवे होते…मास्क घालायला हवे होते. मग आधीच ऐका ना, असा सल्ला देत राज ठाकरेंबद्दल काय बोलणार. ते एका पक्षाचे नेते आहेत पण मास्क का वापरत नाहीत याचं त्यांनी ठोस विश्लेषण करणे गरजेचे आहे. वैद्यकीय कारण काय आहे?, हे त्यांनी स्पष्ट करायला हवे. ते सुद्धा कलाकार आहेत, जाणकार आहेत. लोकनेते आहेत. त्यांनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे, मास्क का वापरू नये? मुख्यमंत्री, पंतप्रधान म्हणतात मास्क वापरा… तसं राज ठाकरेंनी पटवून दिले पाहिजे मास्क का वापरू नये. पण शेवटी मास्क न वापरणे लोकांसाठी धोका आहे. काल अजित पवार (Ajit Pawar) यांनीही सांगितले. ते स्वतः या संकटातून गेले आहेत. मास्क वापरणे किती गरजेचे आहे हे ज्यांना करोना झाला आहे किंवा होऊन गेला आहे त्यांना ठाऊक आहे.

कधी कधी आमच्याडूनही ढिलाई होते, पण तसं चालत नाही. रस्त्यावर फिरताना, सार्वजनिक ठिकाणी, नियमांचे पालन करायला हवे. मी बहुतांश वेळा नियमांचं पालन करतो. पण जेव्हा मास्क खाली येतो तेव्हा मला मुख्यमंत्र्यांची आठवण येते. कारण त्यांनी असं पाहिलं तर ते ताबडतोब चंपी करतात. प्रेमाने म्हणा किंवा काळजीपोटी.. पण मास्क घालण्याचा ते नेहमी आग्रह धरतात, असं राऊत म्हणाले.

जेव्हा संजय राऊतांना दंड होतो…

मास्क घातला नाही तर बऱ्याच ठिकाणी कारवाई होते. दिल्लीत मी स्वतः कारवाईला समोरा गेलो आहे. दंड भरला आहे. माझ्यासह अनेक खासदारांनीही दंड भरला आहे. एकदा गाडीतून विमानतळावर जात असताना फोनवर बोलण्यासाठी मास्क थोडा खाली केला होता. पण पोलीस पथकाने ते बरोबर हेरलं. माझी गाडी बाजूला घेतली. माझे स्वीय सहाय्यक त्यांना म्हणाले, खासदार साहेब आहेत. त्यावर पोलिसांचे उत्तर बाणेदार होते, ते मला खूप आवडले. खासदार असले म्हणून काय झाले ? मास्क वापरणे आवश्यक आहे आणि खासदार साहेब कायदा तयार करणारी मंडळी आहेत. आम्ही कायद्यानुसार कारवाई करतो. मी ताबडतोब दंड भरला कारण मी नियम मोडला होता, असंही संजय राऊत यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER