राज ठाकरेंनी शेअर केला काश्मिरी तरुणीने मराठीप्रति आदर दाखवलेला व्हिडीओ

Raj Thackeray

मुंबई : महाराष्ट्रात मराठी भाषेचा आग्रह धरण्याची भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कायम घेतली असल्याचे अनेक वेळा दिसून आले. आज जागतिक मराठी भाषा दिवसानिमित्तही त्यांनी सकाळी एक ट्विट करत मराठी भाषा ही ज्ञानभाषा व्हावी ही सदिच्छा ! शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर काही तासांतच त्यांनी पुन्हा एकदा ट्विट करत एक व्हिडीओ शेअर केला आहे.

“मराठीचं वाकडं करण्याची हिंमत कोणाचीही नाही” – मुख्यमंत्री ठाकरे

मराठी भाषेत गाणाऱ्या एका काश्मिरी तरुणीचा हा व्हिडीओ आहे. शमीम अख्तर असे या तरुणीचे नाव आहे. काश्मिरी वाद्यांसह ती गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या आवाजातील ‘रुणुझुणु रे भ्रमरा, सांडी तू अवगुणु रे भ्रमरा’ हे गाणे गाताना दिसत आहे. यावरून परराज्यातील तरुणांनाही महाराष्ट्राच्या मराठी भाषेची आवडच नाही तर आकर्षणही असल्याचं राज ठाकरे यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

‘संत ज्ञानेश्वरांच्या रचना पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि लतादीदींनी कळसास नेल्या.त्यातील एक रचना शमीम अख्तर ह्या काश्मिरी तरुणीला काश्मिरी वाद्यसाजात गावीशी वाटणं हा कश्मिरीयतने मराठीप्रति दाखवलेला आदर, तो वृद्धिंगत होवो, राज्याला आपल्या वैभवाची जाणीव करून देवो, असे म्हणत त्यांनी व्हिडीओ शेअर केला आहे.