शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र; राज ठाकरेंची भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरली

Uddhav Thackeray-Sharad Pawar-Raj Thackeray

मुंबई : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं ‘महाविकास आघाडी’च सरकार लवकरच स्थापन होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. दिल्लीतून काँग्रेस श्रेष्ठींनी सत्ता स्थापनेसाठी हिरवा कंदील दाखवल्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरेला सोबत घेऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात सिल्व्हर ओक या निवासस्थानी गुरुवारी रात्री उशिरा पोहोचले. जवळपास तास भर चाललेल्या या बैठकीत नव्या सरकारच्या खातेवाटपावर अंतिम निर्णय झाल्याची माहिती पुढे येत आहे. आणि आजच ‘महाविकासआघाडी’चे नेते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. तसेच सोमवारी (२५ नोव्हेंबर) ला नव्या सरकारचा शपथविधी समारोह होणार असल्याची माहितीही पुढे येत आहे. त्यामुळे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेली भविष्यवाणी खरी ठरणार आहे.

मध्यरात्री पवार-ठाकरे भेट, चर्चा सकारात्मक; आजच सत्ता स्थापनेचा दावा

दोन वर्षांपूर्वी नाशिकमधील एका जाहीर सभेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवसेनेच्या राजकीय भविष्यावर भाष्य केलं होतं. ‘भाजप आणि शिवसेना एकत्र निवडणुका एकत्र लढवणार आणि निवडणुका झाल्या की शिवसेना राष्ट्रवादी पक्षासोबत जाणार आणि भाजप विरोधी पक्षात बसणार… हा काय पत्त्यांचा क्लब आहे का? माझे पिसून झाले, आता तुझे पिस म्हणायला’’, असं राज ठाकरे म्हणाले होते. ज्यावेळी शिवसेनेचे मंत्री आम्ही राजीनामे खिशात घेऊन फिरत आहोत, असं जाहीरपणे सांगत होते, त्यावेळी राज यांनी ही भविष्यवाणी केली होती.