शिवसेनेला डिवचण्यासाठी सेनाभवनासमोरच राज ठाकरेंचं भगवं पोस्टर !

मुंबई : विधानसभा निवडणुकीत प्रखर विरोधी पक्ष म्हणून निवडून द्या असे आवाहन करणा-या राज ठाकरेंच्या मनसेचा राज्यात एक आमदार निवडून येऊ शकला. त्यानंतर ज्यांना लोकांनी विरोधात बसण्यासाठी कौल दिला त्यांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली आणि शिवसेनेच्या युती तोडण्याने सर्वात मोठा पक्ष ठरलेला भाजपा सत्तेपासून दूर राहिला. एकूणच या विधानसभा निकालानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले.

सत्तेच्या प्रवाहात येण्यासाठी आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही कंबर कसली आहे. हिंदुत्त्वाच्या मुद्द्यापासून शिवसेना आता भरकटलेली पाहून राज ठाकरे यांनी हिंदुत्त्वाच्या मुद्द्याला लक्ष्य केले आहे. यापूढे मनसेची थेट स्पर्धा शिवसेनेसोबत असेल असेच सध्याच्या मनसेच्या हालचालींवरून दिसत आहे.

उद्धव ठाकरेंच्या शपथविधी दिवशीच राज पूत्र अमित ठाकरेंचे आंदोलन, आता बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनीच मनसेचे महाअधिवेशनाचे आयोजन करणे या सर्व घडामोडी मनसे विरूद्ध शिवसेना असे चित्र पूढे येते. अशातच मनसेने महाअधिवेशनाचे पोस्टर शिवसेना भवनासमोर लावून मनसे विरूद्ध शिवसेनेला अजूनच दुजोरा दिलेला आहे.

मनसेच्या पहिल्या महाअधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत दादरमधील शिवसेना भवनासमोर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा फोटो असलेलं भगवं पोस्टर लावण्यात आलं आहे.

‘सत्तेसाठी सतराशे साठ, महाराष्ट्र धर्मासाठी एकच सम्राट’ असं या पोस्टरवर लिहिलं आहे. सेनाभवनासमोर गुरुवारी रात्री हे भव्य पोस्टर लावण्यात आलं. त्यानंतर, मराठी आणि हिंदुत्व यांची सांगड घालणाऱ्या ‘महाराष्ट्र धर्मा’वर मनसे पुढची वाटचाल करणार का? याबाबत चर्चा सुरु झाली आहे.

महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व करणाऱ्या शिवसेनेला डिवचण्यासाठीच मनसेने हे पोस्टर शिवसेना भवनासमोर लावल्याचीही चर्चा होत आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त मनसेने 23 जानेवारी ही तारीख निवडली आहे. त्यासोबतच पक्षाच्या झेंड्यातही बदल करत मनसे हिंदुत्वाचे राजकारण करणार असल्याची चर्चा सुरु आहे.

राज ठाकरेंमुळेच राऊत सामनात, अन्यथा कारकुनी करतांना दिसले असते – मनसे