‘राज’दरबार होतोय जनतेचा दरबार; केबलचालक ते बेस्ट कर्मचारी ‘राज’दरबारी

Raj Thackeray

मुंबई : राज्यात शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या साथीने सरकार स्थापन केले. मात्र जनतेचे प्रश्न सोडवण्यात ठाकरे सरकार सपशेल अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. छोटे-मोठे उद्योजक, व्यावसायिक आपले प्रश्न सुटत नसल्याचे पाहून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याकडे न्यायासाठी येत आहे. कोरोना परिस्थितीमध्ये जनतेचे अनेक प्रश्न ‘कृष्णकुंज’वर सोडवले जात आहेत. प्रश्न सुटले की राज ठाकरे यांचे आभार मानण्यासाठी रिघ लागते, तर दुसरीकडे पक्षातील इन्कमिंगही हळूहळू वाढताना पाहायला मिळत आहे. जनतेचे प्रश्न आणि पक्षप्रवेशांच्या समीकरणामुळे ‘कृष्णकुंज’ चर्चेत आहे.

जिओ कंपनीमुळे केबल व्यवसाय धोक्यात आल्याचे सांगत आज केबल मालकांनी राज ठाकरे यांच्याकडे धाव घेतली. “इन मुंबई, हॅथवे, डीजे, सिटी केबल यासारख्या मोठ्या कंपन्या याआधीही भारतात आल्या, पण त्यांनी केबलचालकांना हाताशी धरुन आपला व्यवसाय पुढे नेला आणि त्यांचा उदरनिर्वाह चालू ठेवला. पण आता जिओ कंपनीमुळे केबल मालकांचा व्यवसाय धोक्यात आला आहे. कारण जिओ अनधिकृतरित्या विनापरवाना व्यक्तींना संपर्क करुन कनेक्शन देण्याचे काम करत आहे. जिओने केबल व्यवसायात येण्याआधी केबल व्यावसायिकांना सोबत घेण्याचं सांगितलं होतं” असं गाऱ्हाणं केबल मालकांनी ‘राज’दरबारी मांडलं. याबाबत लक्ष घालतो, असं आश्वासन राज ठाकरे यांनी दिलं आहे.

बेस्टमध्ये हंगामी पदावर असलेल्या कर्मचाऱ्यांना आता बेस्टमध्ये कायमस्वरुपी घेतले जाणार आहे. हा मुद्दा गेले अनेक दिवस मनसेच्या कर्मचारी सेनेने उचलून धरलेला होता. अखेर या कर्मचाऱ्यांना बेस्टमध्ये सामाविष्ट केले जाणार आहे. याच निमित्ताने बेस्ट कर्मचाऱ्यांनी राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी जाऊन आभार मानले. एकंदरीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. जनतेचे वेगवेगळे प्रश्न असो किंवा पक्षप्रवेश, राज ठाकरे यांनी संबंधित मंत्र्यांना फोन केल्याने काही दिवसात प्रश्न सुटल्याचं अनेक जण सांगतात. त्यामुळे ‘राज’दरबार हा जनतेचा दरबार होताना दिसत आहे.

तर ‘सिडको’च्या 14 हजार 500 सदनिका सोडत धारकांकडून लाखो रुपये मुद्रांक शुल्क आकारण्यात आले होते. ते आता एक हजार रुपये करण्यास मनसेने सिडकोला भाग पाडले. याचे आभार मानण्यासाठी सिडको सोडत धारक आले होते. त्यांनीही राज ठाकरे यांचे आभार मानले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER