पुणे महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे सज्ज, उद्या नव्या शिलेदारांशी चर्चा करणार

पुणे: आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी ( Pune Municipal Corporation elections) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)सक्रिय झाले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे यांनी पुणे शहराच्या कारभारात विशेष लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी पुण्याच्या शहराध्यक्षपदी डॅशिंग नेते वसंत मोरे यांची नियुक्ती केली होती. त्यापाठोपाठ पुण्यातील मनसेची कार्यकारिणीही बदलण्यात आली होती. या नव्या कार्यकारिणीतील शिलेदारांना आता राज ठाकरे यांचे विशेष मार्गदर्शन करणार आहेत.

उद्या राज ठाकरे या नव्या शिलेदारांशी संवाद साधणार आहेत. या सर्वांना राज यांच्या हस्ते नियुक्तीपत्र दिले जाईल. तसेच आगामी महानगरपालिका निवडणुकीच्यादृष्टीने यावेळी रणनीती आखली जाण्याची शक्यता आहे. तेव्हा आता राज ठाकरे आपल्या नव्या मावळ्यांना काय आदेश देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १५व्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना एका ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून संदेश पाठवला होता. यामध्ये त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांचे आभार मानले होते. अनेक पराभव पचवूनही गेली १५ वर्षे साथ देणाऱ्या मनसैनिकांचे राज ठाकरे यांनी आभार मानले. ‘मी तुम्हाला कधीही विसरणार नाही,’ असा शब्दही राज यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.

काही जण सोडून गेले, जाऊ द्यात. पण माझ्यासोबत सह्याद्रीच्या कड्यासारखे टिकून आहेत, त्यांना मी कधीही विसरणार नाही. पक्षाला जे जे यश मिळेल, त्याचे वाटेकरी तुम्हीच असाल. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र तुमच्याच हातून घडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER