ग्रामपंचायत निवडणुकीत मनसे; सर्व ठिकाणी उमेदवार देण्याचे राज ठाकरेंचे आदेश

Raj Thackeray

मुंबई : राज्य निवडणूक अयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर केला. त्यामुळे ग्रामीण भागात पक्षाची पकड अधिक घट्ट करण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. आता या निवडणुकीच्या रणांगणात मनसेनेही (MNS) उतरण्याचा निर्णय घेतला असून, पक्षाध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सर्व जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्षांना उमेदवार उभे करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे मनसेही या निवडणुकीत ताकदीने उतरणार असल्याने ग्रामपंचायतीची निवडणूक चौरंगी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi), भाजप (BJP), वंचित बहुजन आघाडीपाठोपाठ (VBA) आता मनसेनेही ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीसाठी येत्या २३ डिसेंबरपासून उमदेवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्षांना आपल्या भागातील ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेचा उमेदवार उभा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या निवडणुका पूर्ण ताकदीनं लढवण्याच्या सूचनाही राज यांनी दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे मनसेही या निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीत रंगत येणार असल्याचं बोललं जात आहे.

किती जागा लढवायच्या हे स्थानिक नेतृत्व ठरवेल : सरदेसाई

आम्ही ग्रामपंचायतीच्या निवडणुका संपूर्ण ताकदीनिशी लढवणार आहोत. त्यासाठी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिले आहेत. किती जागा लढवायच्या हे अजून ठरलेलं नाही. मात्र, स्थानिक नेतृत्व परिस्थिती पाहून निर्णय घेतील, असं मनसेचे नेते आणि माजी आमदार नितीन सरदेसाई (Nitin Sardesai) यांनी सांगितलं. मनसे हा ग्रामीण भागापर्यंत पोहचलेला पक्ष आहे. त्यामुळे या निवडणुकीत मनसेची ताकद अधोरेखित होईल, असंही ते म्हणाले. मात्र, राज ठाकरे हे ग्रामपंचायत निवडणुकीत प्रचार करणार की नाही हे अद्याप ठरलेलं नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, मनसेने ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्याने त्याचे राजकीय अर्थही काढले जाऊ लागले आहेत. शिवसेनेच्या (Shiv Sena) व्होट बँकेला छेद देण्यासाठी मनसे मैदानात उतरत असल्याचं बोललं जात आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत अवघ्या काही मतांनी विजय होत असतो. मनसेने प्रत्येक मतदारसंघात शे-दोनशे मतं घेतली तरी त्याचा शिवसेनेला मोठा फटका बसून भाजपला फायदा होऊ शकतो, असं राजकीय जाणकार सांगत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER