राज ठाकरेंची भाजपला साद, म्हणाले…कृषी कायदे चुकीचे नाहीत

Raj Thackeray

नवी मुंबई : वाशी टोल नाका तोडफोड प्रकरणी मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर 2014 साली वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात आज राज ठाकरे (Raj Thackeray) यांना जामीन मिळाला. राज ठाकरे स्वत: वाशी कोर्टात हजर झाले होते. राज ठाकरे यांना 15 हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

मागील दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर शेतकरी आंदोलन सुरू आहे. शेतकरी आणि सरकारमध्ये अजूनही तोडगा निघालेला नसून, दिवसेंदिवस आंदोलन चिघळताना दिसत आहे. दुसरीकडे टिकरी, सिंघू आणि गाझीपूर येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची नाकेबंदी केंद्र सरकारनं केली असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त करत सरकारला सुनावलं.

निवडणुकीच्या वेळी माझ्या मागे कधी उभे राहत नाहीत, टीका आम्ही सहन करायच्या, बाकीचे पक्ष वाट लावून ठेवतात, त्याचे प्रश्न आम्हाला विचारायचे असे म्हणत त्यांनी केंद्राने मंजूर केलेल्या कृषी कायद्यावर नाराजी व्यक्त केली. कृषी कायदे चुकीचे नाहीत. त्यात काही त्रुट्या आहेत त्या दुरूस्त कराव्या. हे कायदे बनवत असताना इतर राज्यांच्या सरकारसोबत चर्चा करायला हवी होती. जर असे केले असते तर दिल्लीच्या सीमेवर आंदोलन झाले नसते. चीन, पाकिस्तानच्या सीमेवरही इतका बंदोबस्त बघितलेला नाही, एवढा बंदोबस्त दिल्लीच्या सीमेवर आहे. त्याची काहीही गरज नाही. रिहाना? कोण बाई आहे ती.. कोण कुठली सिंगर.. ती काहीतरी बोलते आणि सरकार तिला उत्तर देतं? तिने ट्वीट करायच्या आधी तुम्हाला तरी माहिती होतं का? भारतरत्नसारख्या व्यक्तींना तुम्ही बोलता? असा टोला राज ठाकरे यांनी सचिन तेंडुलकर यांच्यावर टीका करणाऱ्यांवर लगावला.

मला असं वाटतं हे फारच चिघळलं आहे. आम्ही हे सगळं पाहतो आहोत. शेतकऱ्यांच्या मागे कोण आहेत… त्यांना पैसे कुठून येतायेत वगैरे. सरकारनं जो कायदा आणला आहे, तो कायदा चुकीचा नाही. पण, केंद्राने राज्यांचा विचार करून, राज्यांशी चर्चा करून याची अंमलबजावणी केली पाहिजे. शेवटी प्रत्येक राज्यामध्ये कृषी खातं आहे. प्रत्येक राज्याची कृषी धोरणं वेगळी आहे. प्रत्येक राज्याच्या कृषी मंत्री वा मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घ्यायला पाहिजे होतं. हे प्रकरण इतकं चिघळायची गरज नव्हती. चीनच्या वा पाकिस्तानच्या सीमेवरही मी इतका बंदोबस्त बघितला नाही. इतका बंदोबस्त शेतकऱ्यांसाठी करण्याची आवश्यकता नाही. त्यांच्या मागण्या समजून घेतल्या पाहिजे, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.

प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारावर बोलताना राज ठाकरे यांनी मोदी सरकारला इशाराही दिला. कसं आहे शेवटी ताणताणत आपण कुठपर्यंत नेणार आहोत? एक २६ जानेवारी काय घेऊन बसला आहात तुम्ही याच्यामध्ये…, असं म्हणत राज ठाकरेंनी मोदी सरकारला सावधगिरीचा इशारा दिला. अयोध्येचा दौरा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याबाबतची तारीख अजून ठरलेली नाही. ते काही लपून राहणार नाही, अयोध्येला जाणार आहोच, अशी माहिती देत राज यांनी त्यांच्या आगामी अयोध्या दौऱ्याबद्दल भूमिका स्पष्ट केली.

वीज दरवाढीविरोधात पहिलं आंदोलन मनसेने केले होते हे सगळ्यांनी बघितले आहे. सरकारने पहिलं सांगितलं की, वीज बिल माफ करु, मग थेट घुमजाव केला, मी स्वत: शरद पवारांशी बोललो, त्यानंतर त्यांना अदानी येऊन भेटून गेले आणि सरकारने वीज बिल माफ होणार नाही हा निर्णय घेतला, जनतेने सरकारला प्रश्न विचारायला हवे, सरकार सर्व कंपन्यांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत. मागचे सरकार आणि आताचे सरकार सारखेच आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.

इंधन दरवाढीवर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, इंधन दरवाढीवर भाजपला आंदोलन करण्याची काय गरज होती. केद्रांत सरकार त्यांचंच सरकार आहे. जर त्यांना खरंच प्रश्न सोडवायचा असेल तर त्यांनी केंद्राशी बोलावं. मात्र पेपरमध्ये झळकण्याची हा सर्व आटापिटा सुरू आहे. हे सर्व फक्त लोकांना दाखवण्यासाठी खटाटोप सुरू आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.

यावेळी त्यांना औरंगाबाद नामांतराच्या बाबत प्रश विचारला असता त्यांनी भाजप आणि शिवसेनेवर हल्लाबोल केला. केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना औरंगाबादचं नामांतर का केलं नाही? हा प्रश आधी भाजपला विचारायला हवा. यासाठी शिवसेनाहीतेवढीच जबाबदार आहे. शिवसेना-भाजप दोघांनी याच उत्तर द्यावं. निवडणुकीच्या तोंडावर केवळ राजकारण करण्यासाठी संभाजीनगरचा विषय पुढे आणला गेला, असा आरोपही त्यांनी लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER