राज ठाकरे ऍक्शन मोडवर : बड्या नेत्याला धक्का, तर आज पुणे महापालिकेच्या मोहिमेवर

Raj Thackeray

मुंबई : राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) आता जुन्या गोष्टी बाजूला सारुन आता नव्याने उभारी घ्यायचे ठरवले आहे. यासाठी आता खुद्द राज ठाकरे (Raj Thackeray) ऍक्शन मोडवर (Action Mode) आले आहे. मात्र असे तरी कोणे एकेकाळी पक्षाचा बालेकिल्ला असणाऱ्या नाशिकमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याची बाब समोर आली आहे. याठिकाणी मनसेतील अंतर्गत गटबाजीतून राज ठाकरे यांनी एका नेत्याची पदावरुन उचलबांगडी केली आली आहे. या माध्यमातून राज ठाकरे यांनी नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांना इशारा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर दुसरीकडे आगामी पुणे महापालिकेच्या निवडणुकीवर (Pune Municipal Corporation) राज यांनी विशेष लक्ष देण्यास सुरूवात केली आहे. ते आज पुण्याच्या दौऱ्यावर असून नव्याने निवड केलेल्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.

मनसेच्या नाशिक मध्य विधानसभा निरीक्षक पदावरून सचिन भोसले यांना नुकतेच हटवण्यात आले. अंतर्गत गटबाजीचे राजकारण करत असल्यामुळे राज ठाकरे यांनी भोसले यांना पदावरुन दूर केल्याची माहिती पुढे आली आहे. सचिन भोसले हे माजी महापौर अशोक मुर्तडक यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यामुळे सचिन भोसले यांची गच्छंती ही अप्रत्यक्षपणे मुर्तडक यांना इशारा असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, सचिन भोसले यांनी तुर्तास सबुरीचे धोरण स्वीकारले आहे. आगामी काळात पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारेन, असे सचिन भोसले यांनी सांगितले.

नुकताच नाशिक महागनरपालिकेतील झालेल्या स्थायी समितीची निवडणुकीत भाजप आणि मनसे एकत्र आले होते. त्यामुळे भाजपचे गणेश गीते स्थायी समितीच्या सभापतीपदी निवडून आले होते. या निवडणुकीत मनसे किंगमेकर ठरला होता. भाजप आणि महाविकास आघाडी दोघांचेही प्रत्येकी ८ सदस्य असल्यामुळे नाशिक महापालिका स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीची रंगत वाढली होती. मात्र, मनसेने ठरल्याप्रमाणे भाजपला साथ दिल्याने पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या भाजपच्याच ताब्यात राहण्यास मदत झाली.

दरम्यान, आज राज ठाकरे एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा पुणे दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. पुण्यात पदाधिकाऱ्यांच्या भेटीसाठी, बैठका आणि येणाऱ्या महापालिका निवडणुकीविषयी रणनिती राज ठाकरे आखणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER