‘सीएए’ समर्थनार्थ काढण्यात येणाऱ्या मोर्च्याची दिशा ठरवण्यासाठी आज मनसेची महत्त्वपूर्ण बैठक

Raj Thackeray

मुंबई :- येत्या ९ फेब्रुवारीला ‘सीएए’ कायद्याच्या समर्थनार्थ मनसेने मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसे पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलवण्यात आली आहे. मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या रंगशारदा सभागृहात ही बैठक होणार आहे. यावेळी मोर्च्याची  दिशा ठरवण्यासाठी रणनीती ठरवली जाणार आहे.

मनसेच्या महाअधिवेशनानंतर पक्षात नवा उत्साह संचारल्याचं दिसून येत आहे. महाअधिवेशनातील समारोपाच्या भाषणात राज ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या ‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’ला जाहीर पाठिंबा दिला होता. मनसे ९ फेब्रुवारीला आझाद मैदानात ‘सीएए’च्या समर्थनार्थ भव्य मोर्चा काढणार असल्याची घोषणाही राज ठाकरे यांनी केली होती.

इतर देशातून लोक भारतात सरळ घुसखोरी करतात. त्यामुळे आपल्याला इतर देशांप्रमाणे कडक पावले उचलायला हवी. म्हणून पहिल्यांदा या देशात आलेले बांग्लादेशी आणि पाकिस्तानी मुस्लिम बाहेर काढले पाहिजेत. यासाठी माझा केंद्राला पूर्ण पाठिंबा आहे, असं राज ठाकरे म्हणाले होते. ‘अचानक देशात मोर्चे निघायला लागले, मुस्लिम रस्त्यावर उतरले. मला काहींनी सांगितलं की, त्यांच्या मनात काश्मीर, राम मंदिराविषयी राग आहे. त्यांचा एकत्रित राग आता बाहेर पडताना दिसत आहे. ते जर बाहेरच्या मुस्लिमांसोबत उभे राहात असतील, तर आम्ही त्यांना का साथ द्यावी? अनेक जण म्हणतात, राज ठाकरेचा रंग बदलला का? मात्र माझा रंग तोच आहे. मी रंग बदलून सरकारमध्ये जात नसतो. राज ठाकरे विरोधाला विरोध करत नाही.’ असं राज ठाकरे भाषणात म्हणाले होते.